
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली आहेत. त्यांनी पक्षात उद्भवलेल्या बंडाच्या दुसऱ्याच दिवशी कराडमध्ये जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. तिथेच त्यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली होती. आज शरद पवार हे आज छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधील येवल्यात आपली पहिली सभा घेतली...
शरद पवार म्हणाले की, आज बऱ्याच काळानंतर येवल्यात आलो आहे. येथे आमचे अनेक सहकारी होते. काही सहकाऱ्यांनी आमची साथ सोडली. राजकारणात अनेक चढ-उतार आले. अलीकडे आमच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. अनेक वर्ष पुरोगामी विचारांना आम्ही साथ दिली. सामान्य जनतेने आमची साथ कधीही सोडली नाही. पवारांनी नाव दिले त्यांना जनतेने निवडून आणले. मी दिलेल्या नेत्याचे नाव कधीच चुकले नाही. माझ्या विचारावर निवडून आले. मात्र येवल्यात माझा अंदाज चुकला, असा टोला शरद पवारांनी छगन भुजबळांना लगावला.
ते पुढे म्हणाले की, मी इथे कुणावर टीका करायला आलो नाही. येवल्यात पाणी-उद्योगधंद्यांचा प्रश्न गंभीर आहे. काही लोकांना आम्ही विश्वासावर हा मतदारसंघ दिला होता. एका काळात चुकीच्या गोष्टी घडल्या. आता चुकीच्या गोष्टी दुरुस्त करायला हव्यात. आता आमच्यावर अधिक जबाबदारी आहे.
मी कधीही स्वाभिमान सोडणार नाही. काही लोक म्हणता माझं वय झालं. वय ८३ असलं तरी गडी पाहिला कुठेय, वयाचा उल्लेख केला तर महागात पडेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.