Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याSharad Pawar : येवला-बीडनतंर आता शरद पवारांचे 'मिशन कोल्हापूर'; ऐतिहासिक दसरा चौकातून...

Sharad Pawar : येवला-बीडनतंर आता शरद पवारांचे ‘मिशन कोल्हापूर’; ऐतिहासिक दसरा चौकातून रणशिंग फुंकणार

कोल्हापुर | Kolhapur

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या फुटी नंतर पुन्हा पक्ष बांधणीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी कंबर कसलेली आहे. त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा सुरू केलेला आहे. येवला, बीड येथील जाहीर सभेनंतर शरद पवार आता २५ ऑगस्टला कोल्हापुरात येत आहेत. या दिवशी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात त्यांची सायंकाळी ४ वाजता जाहीर सभा होणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल.

- Advertisement -

दरम्यान शरद पवार यांच्या प्रेमाने एकेकाळी अश्रू ढाळणारे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पवार यांची साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात सामील झाले. पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून मुश्रीफ यांची ओळख होती. मात्र त्यांनी शरद पवार यांची साथ सोडल्याने अनेकांनी मुश्रीफ यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यावर आता खुद्द शरद पवार हेच मुश्रीफ यांना उत्तर देतील का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तसेच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार असल्याने शाहू महाराज महाविकास आघाडीचे या मतदार संघातील उमेदवार असतील काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. गत वर्षभरात राज्यातील राजकीय समीकरणांत कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांनी खासदार म्हणून कोल्हापूरचे पालकत्व घ्यावे, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. शाहू महाराजांनी या विषयी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. पण आता ते शरद पवारांच्या सभेचे अध्यक्षपद भूषवणार असल्यामुळे मविआच्या प्रयत्नांना यश येताना दिसून येत आहे.

गत काही महिन्यांपासून शाहू महाराजांनी मविआतर्फे लोकसभेच्या रिंगणात उतरावे यासाठी प्रयत्न सुरू होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही त्यांची राजवाड्यावर जाऊन भेट घेतली होती. शाहू महाराजांचे मविआतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ही जागा कोणत्याही पक्षाच्या वाट्याला गेली, तर त्यांच्या उमेदवारीत कोणतीही अडचण येणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या