मोदी-पवारांच्या भेटीने राज्याचे राजकारण तापले

तासभर चर्चेत काय शिजले? : अनेक तर्क-वितर्कांना उधाण
मोदी-पवारांच्या भेटीने राज्याचे राजकारण तापले
संग्रहित

नवी दिल्ली / New Delhi - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीटच्या माध्यमातून या भेटीची माहिती दिली आहे. या दोन नेत्यांमध्ये कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली नाही. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू असताना शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

इतकंच नाही तर सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीत आहेत. पवार- मोदी भेटीपूर्वी फडणवीस आणि शरद पवार यांच्यात महत्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते तसेच याआधी फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातही तासभर चर्चा झाली. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातल्या गैरव्यवहारांबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दिल्लीत भेट झाली होती. यानंतर राज्यात मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आले होते. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील राजकारणही वेगळं वळण घेणार का? याकडे अनेकांचं लक्ष आहे.

दरम्यान, पवार-मोदी भेटीआधी भाजपच्या दोन केंद्रीय मंत्र्यांनी पवारांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शरद पवारांची भेट घेतली. यामुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. देशात 2014 पासून शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. मात्र, 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या मधल्या भेटीगाठी अगदीच कमी झाल्या होत्या. त्यामुळे बर्‍याच कालावधीनंतर या दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट झाली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून (19 जुलै) सुरू होणार आहे. या अधिवेशनामध्ये देशातील करोनाची परिस्थिती, फ्रान्समध्ये नव्याने सुरू झालेली राफेल कराराची चौकशी, देशातील लसीकरणाची अवस्था या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शरद पवारांसारख्या जाणत्या नेत्यासोबत चर्चा करण्याची ही रणनीती असू शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

........

राष्ट्रपतीपदासाठी पवारांच्या नावाची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा आहे. या मुद्द्यावरून भाजपाकडून देखील सातत्याने टीका केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये राष्ट्रपतीपदाविषयी देखील चर्चा झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

......

पवार म्हणतात...राष्ट्रीय हिताचा विषय

करोना, देशाची अर्थव्यवस्था अशा राष्ट्रीय हिताच्या विषयांवर चर्चा झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरवर म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन शरद पवार यांनी भेट घेतली. या बैठकीत विशेष करून सहकारी बँकांसदर्भात जे कायद्यामध्ये केंद्र सरकारने बदल केले आहेत, त्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. केंद्राने कायद्यात केलेल्या बदलामुळे सहकारी बँका आहेत त्यांचे अधिकार कुठे ना कुठे मर्यादित करून आरबीआयला जास्त अधिकार त्यामध्ये देण्यात आले. सहकार हा राज्याचा विषय आहे. घटनेत बदल करून याला स्वायत्ततेचा अधिकार दिला गेला. त्यामुळे या संदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्रकही सादर केलं. देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषायांवर देखील चर्चा झाली असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. याशिवाय, देशातील करोना परिस्थिती, अनेक ठिकाणी बंद पडत असेली लसीकरण प्रक्रिया या संदर्भातही शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांची दिल्लीत कुठलीही भेट झाली नाही. पंतप्रधान मोदींशी शरद पवारांची भेट होणार असल्याचं काँग्रेस नेत्यांना माहिती होतं, असेही मलिक म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com