शरद पवार-मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा

शरद पवार-मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा

मुंबई / Mumbai - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

राज्यातील आणि राजधानी दिल्लीतील गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र: वस्तुस्थिती, संधी आणि दिशा या विषयावर बैठक झाली. त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ खडसे यांच्यासोबत पवार यांची बैठक झाली.

या बैठकांनंतर काही वेळातच शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले. साधारण अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून या चर्चेचा तपशील मिळाला नसला तरी या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर सध्या राज्यातील महाविकास आघाडीचे काही नेते आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर एकनाथ खडसे यांच्यावरही चौकशीची टांगती तलवार आहे. या स्थितीला कसं सामोरं जायचं हा आघाडीसाठी कळीचा प्रश्‍न बनला आहे. त्यासोबत महाविकास आघाडीतही गेले काही दिवस तणाव दिसत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा करताना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घ्यायची हासुद्धा प्रश्‍न आहे. या पार्श्‍वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील आजची भेट ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com