शरद पवार गुगली टाकण्यात एक्स्पर्ट - सुशीलकुमार शिंदे

शरद पवार गुगली टाकण्यात एक्स्पर्ट - सुशीलकुमार शिंदे

पुणे (प्रतिनिधि) / Pune - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद यांच्या भेटीमध्ये काळजी करण्याचे काही कारण नाही, शरद पवार हे गुगली टाकण्यात एक्स्पर्ट आहे. या भेटीला वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही. महाविकासआघाडी सरकार भक्कम आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कॉँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने पुन्हा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले यांची स्वबळाची भाषा योग्यच आहे. आम्हालाही आमचा काँग्रेस पक्ष पुन्हा खंबीर करायचा आहे, असेही शिंदे म्हणाले. केंद्राकडून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होतो आहे. हे दूर्दैवं आहे. तसेच, केंद्रात नवे सहकार खाते निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील सहकार चळवळीला कोणताही धोका पोहोचणार नाही, ही चळवळ भक्कम पायावर उभा आहे. असेही सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले.

सर्व जातीधर्मातील लोकांना समान वागणूक देणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे काँग्रेस पक्षाने आजवर संरक्षण केले आहे. अलीकडच्या काळात राज्यघटनेमध्ये छेडछाडीचे काही प्रयत्न होत आहेत. मात्र, काँग्रेस पक्ष राज्यघटनेबाबत जागरूक असून, राज्यघटनेत कोणताही बदल आम्ही होऊ देणार नाही. राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही कायम पार पाडू असे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव दिवंगत डॉ. विकास आबनावे यांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांच्या नावाने स्थापण्यात आलेल्या 'डॉ. विकास आबनावे फाउंडेशन'चे उद्घाटन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. टिळक रस्त्यावरील संस्थेच्या अशोक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, वात्रटीकाकार रामदास फुटाणे, संस्थेचे मानद अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, सचिव प्रसाद आबनावे, सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, संचालक प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, दिलीप आबनावे, गौरव आबनावे, राजेश आबनावे, शिरीष आबनावे आदी उपस्थित होते. यावेळी शिंदे यांच्या हस्ते फाउंडेशनच्या लोगोचे अनावरण आणि संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com