राष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा?

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, शेवगाव-पाथर्डीचा समावेश
राष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आगामी निवडणुका लढविण्याबाबत आघाडीतील तिन्ही पक्षांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलेली असतानाच राष्ट्रवादीने मात्र विधानसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने ‘सुपर 100’ या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील 100 मतदारसंघांना टार्गेट केलं असून या मतदारसंघांमध्ये संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. यात नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि शेवगाव-पाथर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे. येथील जबाबदारी महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सचिव इम्तीयाज शेख यांच्याकडे देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक संघटन हे प्रत्येक मतदारसंघात मजबूत करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सुपर 100 हा उपक्रम हाती घेण्यात आला असून काल 34 विधानसभा निरीक्षक पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली. राज्यातील युवकांची बांधणी करण्याच्या हेतूने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने विधानसभा निरीक्षकपदी नवनिर्वाचित 34 पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात श्रीगोंदा आणि शेवगाव-पाथर्डी या मतदारसंघांत पक्षाची ताकद वाढविण्याची जबाबदारी लातूरमधील उदगीर मतदारसंघातील युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी इम्तीयाज खान यांच्याकडे देण्यात आली आहे.

गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकत मुसंडी मारली. त्यात अकोलेत डॉ. किरण लहामटे, कोपगावात आशूतोष काळे, राहुरीत प्राजक्त तनपुरे, पारनेरात निलेश लंके, कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार, नगरमध्ये संग्राम जगताप यांनी बाजी मारत आमदारकी मिळविली. श्रीगोंदा आणि शेवगाव-पाथर्डीत राष्ट्रवादीचे उमेदवारांचा अल्प मतांनी पराभव झालेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा यश मिळू शकते त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवर राष्ट्रवादीने लक्ष केंद्रीत केले आहे.

श्रीगोंद्यातील आमदार बबनराव पाचपुते हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. पण काही मतभेदानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. पण यावेळी भाजपाकडून निवडणूक लढवून पाचपुते निवडून आले. शेवगाव-पाथर्डीतून स्व. राजीव राजळे हे राष्ट्रवादीचे आमदार होते. पण पुढे त्यांच्या पत्नी मोनिका राजळे यांनी भाजपाकडून निवडूक लढवत आमदार झाल्या. या दोन्ही जागा पूर्वी राष्ट्रवादीकडे असल्याने पुन्हा त्या खेचण्यासाठी राष्ट्रवादीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. आता या मतदारसंघात निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना दर तीन महिन्यांनी अहवाल प्रदेशाध्यक्षांना द्यावा लागणार आहे.

काय आहे ‘सुपर 100’

सुपर 100 ही मोहीम राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील 100 विधानसभा मतदारसंघ निवडण्यात आले आहेत. या मतदारसंघात पक्षाचं संघटन मजबूत करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरुण पदाधिकार्‍यांवर देण्यात आली आहे. या पदाधिकार्‍यांनी या मतदारसंघात जाऊन तरुण-तरुणींना पक्षात आणायचं आहे. मेळावे, मोर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संघटन वाढवण्यावर या मतदारसंघात काम करायचं आहे, अशी माहिती महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सचिव इम्तीयाज शेख यांनी दिली.

तसेच इतर पक्षातील किंवा पक्षांशी संबंध नसलेल्या तरुणांना राष्ट्रवादीकडे आकर्षित करण्याची तसेच प्रत्येक विधासभेत सोशल इंजिनीयरिंगचा प्रयोग राबवण्याची जबाबदारीही या तरुण पदाधिकार्‍यांवर देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यासाठी 34 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून इतर निरीक्षकांचीही लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.

100 मतदारसंघच का ?

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. तीन पक्षांची विधानसभेत आघाडी झाल्यास प्रत्येकाच्या वाट्याला 80 ते 100 जागा येणार आहेत. जर शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाल्यास दोन्ही पक्षाच्या वाट्याला 120 ते 140 जागा येऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीने जागावाटपात किमान शंभर जागा मिळतील या हिशोबाने 100 मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी दोन आणि तीन नंबरला होती, अशा मतदारसंघाचा या सुपर 100मध्ये समावेश आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने या मतदारसंघावर फोकस केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com