नवाब मलिकांची गौप्यस्फोटांची मालिका सुरूच; भाजपाला दिलं थेट आव्हान, म्हणाले...

नवाब मलिकांची गौप्यस्फोटांची मालिका सुरूच; भाजपाला दिलं थेट आव्हान, म्हणाले...

मुंबई | Mumbai

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या (sameer wankhede) कार्यपद्धतीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यांनी अनेक गौप्यस्फोटही केले. दरम्यान आज पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच भाजपाला (BJP) देखील त्यांनी थेट आव्हान दिल आहे.

मलिक म्हणाले की, 'नीरज गुंडे (niraj gunde) हा मागच्या सरकारचा दलाल आहे. हा दलाल आता माझ्यावर आरोप करत आहे. ज्याच्या चेंबूरच्या घरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जाऊन बसायचे. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनमध्ये थेट जायला मिळायचे. सगळ्या विभागाच्या सेक्रेटरीच्या ऑफिसमध्ये याचे जाणे-येणे असायचे. हाच व्यक्ती रश्मी शुक्लाच्या प्रकरणात (Rashmi Shukla case) गोंधळ देखील घालत होता. आणि आता देखील हाच दलाल समीर वानखेडे यांच्या कार्यालयात तासनतास जाऊन बसत आहे. हा तिथे का जातो तिथे तासनतास का बसतो. याचे कारण मला माहिती आहे. काशिफ खान (Kashif Khan), मोहित कंबोज (Mohit Kamboj), कॉर्डियला क्रूझ (Cordelia Cruz) यांचा एकमेकांशी संबंध असून, ही बाब मी लवकरच समोर आणणार आहे. त्यानंतर भाजपला राज्यात तोंड दाखवायला देखील लाज वाटेल.' असा शब्दात नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरज गुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

तसेच, 'भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे दिवाळीनंतर घोटाळे बाहेर काढणार असल्याची धमकी देत आहेत. आम्हाला काय धमक्या देताय. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आगामी अधिवेशनात मीच भाजपचे पुराव्यानिशी घोटाळे उघड करणार आहे. मी असा भांडाफोड करणार आहे की भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना तोंड लपवून पळावे लागेल, असा दावा मलिक यांनी केला आहे. तसेच पिक्चर सुरू आहे. इंटरव्हल झाला आहे, असंही ते म्हणाले.

तसेच, नवाब मलिक यांनी काल जो एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला होता त्याबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे यांच्या मेहुण्याचा मी काल फोटो ट्विट केला आहे. सध्या तो व्हेनिसला राहतो. तो मुस्लिम आहे. त्याचा फोटो ट्विट करण्याचं कारण असं होतं की काल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची वानखेडे यांनी भेट घेतली. मी माझ्या मतावर ठाम आहे की समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण मुस्लिम होते. बोगस दाखल्यावर ही नोकरी घेण्यात आली. २०१५ पासून वानखेडे यांनी आपली आयडेंटिटी लपवली. म्हणजे दाऊद वानखेडे यांनी डी के वानखेडे नावं लिहिलं. आता ज्ञानदेव वानखेडे लिहायला सुरुवात केली. आपली आयडेंटिटी ओपन होईल यासाठी वानखेडे यांनी घटस्फोट दिला.

दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानिचा खटला दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक सातत्याने भाजप नेते मोहित कंबोज आणि त्यांच्या परिवारावर गंभीर आरोप लावत होते. मुंबईत ड्रग्ज प्रकरणी सुद्धा वारंवार त्यांच्या परिवाराचे संबंध असल्याचे म्हटले जात होते. याच कारणामुळे ९ ऑक्टोंबरला मोहित यांनी मलिक यांच्या नावे एक नोटिस धाडली होती. त्यामध्ये असे म्हटले की, कोणत्याही पूराव्याशिवाय मानहानिकारक विधान करणे चुकीचे आहे. मात्र नवाब मलिक यांनी त्या नोटिस व्यतिरिक्त ही विधान करणे सुरुच ठेवले होते आणि पुन्हा ११ ऑक्टोंबरला त्यांच्या परिवारावर निशाणा साधला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com