मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणारच! राणा दाम्पत्य ठाम

मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणारच! राणा दाम्पत्य ठाम

मुंबई | Mumbai

नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी उद्या (२३ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर (Matoshree) जाऊन हनुमान चालीसा पठणाचा (Hanuman Chalisa) निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार ते आज मुंबईत दाखल झाले आहेत.

दरम्यान आम्हाला कितीही विरोध झाला तरी उद्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

रवी राणा बोलतांना म्हणाले की, 'मातोश्रीच्या बाहेर आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता, सगळ्या कायदेशीर बाबी पाळून शांततेच्या मार्गाने आम्ही हनुमान चालीसा वाचणार आहोत. आम्ही या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. हनुमान चालीसा महाराष्ट्रात वाचण्यापासून आम्हाला का अडवलं जातं आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाचली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही हनुमान चालीसा वाचणार आहोत' असं रवी राणा यांनी सांगितलं.

तसेच, दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आमचं स्वागत केलं असते. तर, एक वेळा नाही १०० वेळा वाचायला सांगितलं असते. आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकराना कुठलही त्रास देणार नाही. आमचे कार्यकर्ते जे येणार होते, त्यांना मी सांगतो कोणी मुंबईत येऊ नका, आम्हाला मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही, असेही त्यांनी म्हटले.

नवनीत राणांचा शिवसैनिकांना इशारा

यावेळी नवनीत राणा बोलतांना म्हणाल्या की, 'आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकत मोठे झाले आहोत. आज बाळासाहेबांची तिसरी पिढी राजकारणात आहे. मी मुंबईची मुलगी असून विदर्भाची सून आहे. सर्व ताकद माझ्यासोबत आहे. कोणीही माझं काही बिघडवू शकत नाही,' असा इशारा खासदार नवनीत राणांनी शिवसैनिकांनी दिला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक करत आहेत. त्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा आहे. आम्ही मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालिसेचं पठण करणार. आता शिवसैनिक की हनुमान चालिसेत दम आहे हे उद्या दिसणार आहे. माझ्या धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मला कोणीही थांबवू शकत नाही. शिवसेनेला हरवूनच मी खासदार झाले आहे, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com