राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी सोडले मौन, म्हणाले...

राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी सोडले मौन, म्हणाले...

दिल्ली | Delhi

पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री असणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तर आता पंजाबचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष असणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. यात, आपण शेवटच्या श्वासापर्यंत हक्क आणि सत्याची लढाई लढत राहणार. तसेच नैतिकतेशी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे सिद्धूंनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर भ्रष्ट मंत्र्यांना पुन्हा आणण्याचा निर्णय आपण कधीही स्वीकारणार नाही, असेही सिद्धू यांनी म्हटले आहे.

सिद्धू म्हणाले, १७ वर्षांचा राजकीय प्रवास एका उद्देशाने केला. पंजाबमधील नागरिकांचे जीवन सुधारणे आणि एखाद्या मुद्द्यावरील राजकारनावर एक स्टँड घेऊन उभे राहणे, हाच माझा धर्म आहे आणि हेच माझे कर्तव्यही आहे. माझे काही वैयक्तिक भांडण नाही. मात्र, माझी लढाई मुद्द्यांची आहे. पंजाबच्या भल्यासाठी उभे राहणे हा माझा अजेंडा आहे आणि मी त्याच्याशी तडजोड करू शकत नाही आणि मी सत्यासाठी लढत राहणार.

दरम्यान पंजाबमध्ये राजकीय उलथापालथ सुरु असतानाच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक सुरू झाली आहे. बैठकीत नवज्योतसिंग सिद्धू यांचे मन वळवण्याच्या रणनीतीवर चर्चा होत आहे. राजीनामा दिल्यानंतर सिद्धू त्यांच्या पटियाला इथल्या निवासस्थानी आहेत. त्याचवेळी, काँग्रेस-हायकमांडने सिद्धूचा राजीनामा नाकारला आहे आणि राज्य पातळीवरच त्यांचं मन वळवण्याविषयी प्रयत्न सुरु केले आहेत. दुसरीकडे सिद्धू यांच्या निवासस्थानी समर्थकांच्या भेटीगाठी सुरु आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com