
नाशिक | Nashik
अब राजा का बेटा राजी नही बनेगा… काम करेल त्यालाच जनता निवडून देईल, अशा शब्दात शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना आव्हान दिलंय.
नाशिक विधान परिषद (MLC) पदवीधर मतदार संघ निवडणुकीतून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या वतीने त्या निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब झालंय. लवकरच ठाकरे गटाच्या नेत्याकडून याविषयी अधिकृत घोषणा करण्यात येईल.
कोण आहेत शुभांगी पाटील?
महाविकास आघाडीकडून पाठिंबा देण्यात आलेल्या शुभांगी पाटील या सध्या धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. त्यांनी बीए, डीएड, एम.ए.बीएड आणि एल एल बी मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचबरोबर शुभांगी पाटील महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक आहेत.
यासोबतच त्या महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्पॉईज असोसिएशनच्या त्या प्रमुख सल्लागार आहेत. याशिवा शुभांगी पाटील या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत.
शुभांगी पाटील या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होत्या. मात्र, काही काळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटना स्थापन करून या संघटने माध्यमातून काम करण्यास सुरुवात केली. २१ सप्टेंबर २०२२ रोजी शुभांगी पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला होता.
नाशिक पदवीधर निवडणुकीत सुधीर तांबे यांच्याविरोधात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांना भाजपनं लढवण्याची तयारी केली होती. परंतु सुधीर तांबे यांनी माघार घेऊन सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं आता भाजप सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिल्यामुळं आता सत्यजीत तांबे हेच भाजपचे उमेदवार असणार असल्याचं बोललं जात आहे.