Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री कुटुंबाला सांभाळू शकले नाहीत, महाराष्ट्राला काय सांभाळणार

मुख्यमंत्री कुटुंबाला सांभाळू शकले नाहीत, महाराष्ट्राला काय सांभाळणार

मुंबई / प्रतिनिधी
ज्या व्यक्तीला प्रशासनाचा शून्य अनुभव आहे अशा व्यक्तीच्या हाती राज्याच्या कारभार आल्याने आज राज्याचे आर्थिक, औद्योगिक आणि नैतिकदृष्ट्याही पतन झाले आहे. संपूर्ण देशभरात भ्रष्टाचारी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख होऊन राज्याची प्रतिमा मलिन करण्याचे पाप ठाकरे सरकारने केले आहे, अशी घणाघाती टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याची सुपारी वाझेंना कोणी दिलेली याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. १०० कोटीची खंडणी वसूल करण्याचे आदेश हे केवळ एकट्या अनिल देशमुख आणि अनिल परब यांचे नसून त्यामध्ये इतरही भागीदारी आहेत, असा आरोपही राणे यांनी केला.

- Advertisement -

कोरोना रुग्णांची वाढती संख्या, कोरोना प्रतिबंधित लसीच्या तुटवड्यावरून सुरू असलेले आरोप- प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर राणे यांनी आज पत्रकार परिषदेत राणे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. आज देशात सर्वाधिक रूग्णसंख्या महाराष्ट्रात आहे, मृत्यूदरही अधिक आहे, लसीकरणाचा वेगही कमी आहे. रूग्णांसाठी औषधे, खाटा यांच्यासह डॉक्टर आणि परिचारिकांचाही तुटवडा असल्याचे राज्य सरकार सांगत आहे. मुळात या सगळ्या उपाययोजनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी कोणाची आहे? आरोग्य क्षेत्रासाठी कोट्यवधीचा निधी राखीव असतो त्यामधुन डॉक्टर आणि परिचारिकांचे रिक्त पदे का भरली जात नाहीत? “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” यानुसार हे राज्य मुख्यमंत्र्यांचे कुटुंब नाही का? असे सवाल राणे यांनी केले.

राज्यातील जनतेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी नाही घ्यायची तर कोणी घ्यायची? राज्यात आता कोणतेही नवीन निर्बंध लावण्याआधी मुख्यमंत्र्यांनी मुंबईभर फिरावे जनतेची परिस्थिती पाहावी मग निर्णय घ्यावेत, असा सल्लाही राणे यांनी दिला. कोरोना रूग्णाच्या वाढीवरून हे सरकार सर्वच पातळीवर पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार का?
आज व्यापाऱ्यांकडून दुकान उघडल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला जात आहे. पण उपमुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात नियमांची जी पायमल्ली केली त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा सवाल करत, सामान्य जनतेचे केवळ शोषण करायचे हाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या