Friday, April 26, 2024
Homeराजकीयजि. प. च्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी

जि. प. च्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी

नंदुरबार – Nnadurbar – प्रतिनिधी :

नंदुरबार येथील जि.प.ची सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या सर्व 56 गटांना समान निधी वाटप करण्यात यावा या मागणीसाठी सुमारे सव्वातास विरोधक व सत्ताधार्‍यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

- Advertisement -

जि.प.च्या सर्व गटांना समान निधी वाटप न झाल्याने विरोधकांनी अजेंड्यावरील विषयांना मंजूरी देण्यासाठी विरोध दर्शविला. यावर मतदान पद्धतीने विषय मंजूर करण्याचे ठरविण्यात आले. मात्र विरोधकांच्या बाजूने अधिक मते असल्याने ठराव मंजूरीअंती 44 सदस्यांना समान निधी वाटप तर सदस्य अपात्र झालेल्या उर्वरित 11 गटांसाठी निधी वाटपाचा अधिकार जि.प.अध्यक्षांकडे देण्यात आल्याचा निर्णय झाल्यावर सभेचे पुढील कामकाज झाले.त्यांनतर अजेंड्यावरील 22 विषय मंजुर करण्यात आले

नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांच्या अध्यतेखाली याहामोगी सभागृहात घेण्यात आली. यावेळी समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्यासह सदस्य सभेला उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच समान निधी वाटपावरुन विरोधक आक्रमक झाले. जि.प.सदस्य भरत गावित यांनी जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांच्या कडे समान निधी वाटप करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.

त्यांनतर अजेंड्यावरील विषयांना मंजूरीबाबत विरोधकांनी प्रतिकूलता दर्शविली. यामुळे मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीच्या विषय क्र.4, 5 व 6 साठी मतदान घेतले असता विरोधकांच्या बाजूने 22 तर सत्ताधार्‍यांच्या बाजूने 18 मते मिळाली. यामुळे सदर विषय नामंजूर करण्यात आले. यावर जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी सदस्य जनतेतून निवडून आलेले असतांना जनतेच्या हितासाठीच्या निर्णयांना विरोध दर्शवत असल्याने नाराजी व्यक्त केली. यावर जि.प.सदस्य भरत गावित यांनी जनतेच्या हितासाठी असलेल्या निर्णयांना नव्हे तर कारभाराला विरोध असल्याचे सांगून सर्व गटांना समान निधी वाटप होईपर्यंत कोणत्याही विषयाला मंजूरी देणार नसल्याचे स्पष्ट केले. सुमारे सव्वा तास यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी भरत गावित यांनी विद्यमान 44 सदस्यांसह अपात्र झालेल्या 11 सदस्यांना देखील समान निधी देण्यात यावा, अशी मागणी केली.

तर अ‍ॅड.सीमा वळवी यांनी काही गट लहान तर काही मोठे आहेत. काही गटांमध्ये गावांची संख्या अधिक तर काहींमध्ये कमी असल्याने समान निधी देता येणार नसल्याचे सांगितले. मात्र जोपर्यंत समान निधीचे वाटपाचा ठराव होत नाही तोपर्यंत कोणत्याही विषयाला मंजूरी देण्याबाबत विरोधकांनी प्रतिकूलता दर्शविली. भरत गावित यांनी सांगितले की, सदस्य अपात्र झाले असले तरी तेथील गटात नागरिक राहतात. यामुळे त्यांच्यावर अन्याय का? यासाठी सर्व गटांना समान निधी वाटपाची मागणी भरत गावित यांनी केली. समान निधी वाटपाचा निर्णय झाल्यावर सर्व विषय मंजूर करण्यास आमची हरकत नसल्याचे विरोधकांच्या बाजूने भरत गावित यांनी सांगितले. सुमारे सव्वा तासानंतर निधी वाटपाबाबत निर्णय करण्यात आला. यात सर्व 44 सदस्यांना समान निधी तर उर्वरित 11 गटांसाठी निधी वाटपाचे अधिकार अध्यक्षांकडे राखीव ठेवण्यात आले.

यानंतर अजेंड्यावरील 22 विविध विषयांना मंजूरी देण्यात आली. यामध्ये सन 2011 च्या लोकसंख्येच्या आधारे जिल्ह्यात वाढीव पाच प्राथमिक आरोग्य केंद्र तर 50 उपकेंद्रांच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. यासोबतच प्राथमिक आरोग्य केद्रांना सोलार डिसी- फ्रिज बसविणे, शहादा येथील ऑक्सिजन सिलेंडर जनरेशन प्लान्ट कार्यान्वित करणे, पशुसंवर्धन विभागांतर्गत योजनांमध्ये पुर्नविनियोजन मान्यता देणे, सन 2021-22 या आर्थिक वर्षात प्राप्त झालेले सन 2020-21 च्या बंधीत अनुदान व अबंधित अनुदानाचे जिल्हा परिषद स्तरावर दुसर्‍या हप्त्याच्या कामाच्या निवडीस व नियोजनास मान्यता देणे, सेस फंडांतर्गत कामे मंजूर करणे, सन 2021-22 या वर्षातील शिक्षण विभागासाठी सेस फंडांतर्गत विविध उपक्रमांसाठी मूळ अंदाज पत्रकातील नमूद खर्चास मान्यता देणे आदी 24 विषयांना मान्यता देण्यात आली. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सुरु झालेली सभा सायंकाळी पर्यंत सुरुच होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या