नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्ह्यात ८७ ग्रामपंचायतींसाठी २ हजारावर दाखल झालेल्या अर्जातून आज अर्ज माघार घेतल्याने नंदुरबार तालुक्यातील १५, शहादा तालुक्यातील ६, नवापूर तालुक्यातील २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

आज अखेर २३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी दि.१५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.जिल्ह्यात एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या ८७ ग्रामपंचायतींची निवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर गावागावातून इच्छुकांतर्फे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते.

जिल्ह्यात ८७ ग्रामपंचायतींसाठी दोन हजाराच्यावर नामांकन दाखल झाले होते.यात नंदुरबार तालुक्यातील २२, शहादा तालुक्यातील २७, धडगांव १६, नवापूर १४, तळोदा ७ तर अक्कलकुवा तालुक्यातील १ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

गावातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावागावात ग्रामस्थांनी बैठका लावल्या होत्या. आज दि.४ जानेवारी रोजी नामांकन माघारीची अंतीम मुदत असल्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसिल कार्यालयात मोठी गर्दी जमा झाली होती.

नंदुरबार तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी ४५९ नामांकन दाखल झाले होते. आज माघारीअंती २७६ उमेदवारांनी माघार घेतल्याने १८३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, तालुक्यातील शनिमांडळ, तिलाली, खर्दे-खुर्दे, निंभेल, आराळे, खोंडामळी, विखरण ,मांजरे, काकर्दे, बलदाणे, खोक्राळे, न्याहली, तलवाडे खुर्दे, शिंदगव्हाण, नगाव या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

शहादा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या २४५ सदस्यांसाठी ६४८ दाखल झालेल्या अर्जातून आज माघारीअंती १९९ नामांकन माघार घेतल्याने ४४९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, तालुक्यातील नांदरखेडा, वर्ढे त.श., बामखेडा त. सा., दोंदवाडा, न्यू असलोद, हिंगणी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

तर नवापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी माघार घेणे व निवडणूक लढविणार्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया पार पडली.

धुळीपाडा व सागाळी या दोन ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड झाली असून माघारीनंतर २२९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.तळोदा,तालुक्यातील सात ग्रामपंचायती चा निवडणूकीत सोमवारी अर्ज माघार घेण्याचा मुदतीत ४७ जणांनी आपले अर्ज माघार घेतल्याने आता १३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सर्वात जास्त उमेदवार रेवणानगर या ग्रामपंचायतीतील आहेत.नंदुरबार जिल्ह्यात आज अखेर ८७ पैकी २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ग्रामपंचायतींसाठी दि.१५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.