इंधन दरवाढीवरून नाना पटोले यांचे केंद्रावर टीकास्त्र

इंधन दरवाढीवरून नाना पटोले यांचे केंद्रावर टीकास्त्र

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

महागाईने ( Inflation )सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना पुन्हा स्वयंपाकाचा गॅस ( Gas cylinder )२५ रुपयांनी महाग करुन केंद्र सरकारने (central government ) जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत आहे, अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole )यांनी बुधवारी केली.

स्वयंपाक गॅसच्या दरवाढीवरून पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारवर आज जोरदार निशाणा साधला. मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार उद्योगपती ‘मित्रों’साठीच काम करत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

जानेवारी महिन्यापासून मोदी सरकारने सातत्याने दरवाढ करत गॅस सिलिंडर १९० रुपयांनी महाग केला आहे. युपीए सरकारवेळी ४४० रुपये असणारा हाच एलपीजीगॅस आता ९०० रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस ९०० रुपयांपर्यंत महाग केला. एवढा महाग गॅस गरीब, सामान्य जनेतला परवडणारा नाही, असे पटोले म्हणाले.

गेल्या ८ महिन्यात केंद्र सरकारने ६७ वेळा इंधन दरवाढ केली. पेट्रोल १०७ रुपये, डिझेल ९६ रुपये लिटर असून गॅसच्या किंमतीही सातत्याने वाढवून इंधनावरील कररुपाने मोदी सरकारने सात वर्षात तब्बल २५ लाख कोटी रुपयांची नफेखारी केली आणि सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले, असा आरोपही पटोले यांनी लगावला.

काँग्रेस सरकारने उभे केलेले प्रकल्प विकण्याचा एकमात्र उद्योग गेल्या सात वर्षांपासून धडाक्यात सुरु आहे. सरकारी कंपन्या, बँका, विमा, रेल्वे सर्वकाही उद्योगपती मित्रांच्या हवाली करुन देशाचे वाटोळे करण्याचे काम सुरु आहे. देशातील जनता मोदी सरकारच्या कारभाराला कंटाळली असून महागाईवरुन जनतेत प्रचंड आक्रोश आहे. ही जनताच आता भाजप आणि मोदींना त्यांची जागा दाखवेल, असेही पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com