देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न लोकांना पडला आहे - नाना पटोले

करोनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले
देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न लोकांना पडला आहे - नाना पटोले

पुणे (प्रतिनिधि) / Pune - करोनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे आता देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. देशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत अशी टीका कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. केंद्र सरकारने कोणालाच सोडले नाही, ब्लॅकमेलिंग करून सरकारे पाडली. त्यामुळे देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न लोकांना पडला आहे, असेही ते म्हणाले.

करोना मानव निर्मित आहे हे अमेरिकाही सांगत आहे. चीनमधूनच करोनाची सुरवात झाली. चीनचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी महाबलीपूरम येथे एकत्र आले होते. त्यावेळी ते काय करत होते, त्यांची चर्चा कशाबद्दल झाली हे देशातल्या लोकांना समजले पाहिजे असेही पटोले म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेकडून ऑक्टोबर महिन्यात सांगण्यात आले होते की, भारताला करोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका निर्माण होणार आहे. मात्र आपल्या पंतप्रधानांनी पाकिस्तानसह जगातील १७ देशांना लस पाठवली. ज्या देशाने पुलवामासारखी घटना घडविली. त्यामध्ये आमचे सैनिक शहीद झाले, अशा शत्रू देशाला मोफत लस दिली गेली. पण हीच लस आपल्या देशातील जनतेला द्यायला पाहिजे होती. मात्र तसे काही झाले नाही. त्या बाबत योग्य नियोजन करायला पाहिजे होते. त्यामुळे अनेक नागरिकाचे जीव वाचले असते आणि गंगा नदीत प्रेत वाहताना दिसले नसते,” अशा शब्दात नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

राज्य सरकार पूरस्थिती योग्य रीतीने हाताळत आहे

राज्यात गेल्या काही वर्षांत ढगफुटीचे प्रमाण वाढले आहे. ढगफुटीमुळे परिस्थितीचा अंदाज लवकर येत नाही. त्यामुळे प्राणहानी आणि नुकसान होताना दिसत आहे. मात्र असे असले तरीही राज्य सरकार पूरस्थिती योग्य रीतीने हाताळत असल्याचा दावाही पटोले यांनी केला. भाजपचे नेते आता टीका करत आहेत परंतु ते सत्तेत असताना २०१९ ला जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा देवेंद्र फडणवीस विदर्भात प्रचार करत होते. आता मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असेही पटोले म्हणाले.

..तर गंगेत मृतदेह दिसले नसते

पुण्यात तयार झालेली लस केंद्र सरकारने शत्रू देश असलेल्या पाकिस्तानला दिली. हीच लस जर देशातील नागरिकांना दिली असती तर अनेकांचे प्राण वाचले असते. कारण लसीकरण झाल्यानंतर कोरोना झाला तरी मृत्यू होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे देशातील नागरिकांचे लसीकरण झाले असते तर गंगेत मृतदेह दिसले नसते असा टोला देखील पटोले यांनी केंद्र सरकारला लगावला.

स्थानिक स्तरावर स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला आहे

स्थानिक स्तरावर स्वबळावर लढण्याचा आम्ही पॉलिसी डिसीजन घेतला आहे. आता त्याचा वारंवार उच्चार करायची गरज नाही. मात्र पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी अंतर्गत आलेला पैसा कशा प्रकारे लुटण्यात आला आहे. ते आपण सर्वांनी पाहिले आहे. सत्तेच्या नावाखाली भ्रष्टाचार करणे हा भाजपचा धंदा आहे. त्यामुळे पुणे शहराची लोक हे सर्व ओळखून आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पुण्यातील जनता पुणे महापालिकेत काँग्रेसला स्थान देतील,” असा विश्वास काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com