
नागपूर | Nagpur
राज्यात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून (बुधवार) दोन दिवस नागपूर दौऱ्यावर येणार आहे.
गुरुवारी जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन अमित शहा करणार आहेत. अमित शहा यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही नागपूर विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. एकाच महिन्यात त्यांचा हा दूसरा महाराष्ट्र दौरा आहेत. शाह हे या पूर्वी खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी मुंबईत आले होते.
अमित शहा हे आज रात्री नागपूरमध्ये पोहोचणार आहे. पक्षीय बैठकही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांची अमित शहा भेट घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या स्वागताला नागपूर विमानतळावर उपस्थित राहणार आहेत.
अमित शाह वर्धा रोडवरील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबणार आहेत. तर काल (मंगळवार) रात्रीपासूनच हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीडीडीएसकडून एनसीआय परिसरात तपासणी केली जात आहे.
अमित शाहांसाठी स्पेशल बुलेटप्रूफ वाहनही नागपूरला आले आहे. पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल केला जाण्याची शक्यता आहे.