Thursday, April 25, 2024
Homeराजकीयदोन ग्रामपंचायतींवर प्रशासक

दोन ग्रामपंचायतींवर प्रशासक

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोनाच्या पार्श्वभूमीवर मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींची निवडणूक न होता प्रशासक नेमण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार एप्रिल ते जून या टप्प्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून या टप्प्यात जिल्ह्यातील केवळ दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जुलै ते डिसेंबर या टप्प्यात जिल्ह्यातील 766 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्या ग्रामपंचायतींवरही शासनाचे पुढील आदेश आल्यानंतर प्रशासकराज येणार आहे.

एप्रिल ते जून या महिन्यांत मुदत संपणार्‍या राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम शासनाने घोषित केला होता. परंतु तत्पूर्वीच राज्यात करोनाचे संकट आल्याने हा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य शासनाने मागील महिन्यात दिले होते. या टप्प्यात नगर तालुक्यातील केवळ 2 ग्रामपंचायती आहेत. त्यानुसार विळद व पिंपरी घुमट या ग्रामपंचायतींवर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ठकाराम तुपे यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली आहे. दोन्ही ग्रामपंचायतींचा कार्यभार त्यांच्याकडेच असेल.

1 जुलै ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत जिल्ह्यातील 766 ग्रामपंचायतींचा कालावधी संपत आहे. यात सर्वाधिक 94 ग्रामपंचायती संगमनेर तालुक्यातील आहेत. त्यानंतर पारनेर 88, अकोले 52, कोपरगाव 29, श्रीरामपूर 27, राहाता 25, राहुरी 45, नेवासा 59, नगर 57, पाथर्डी 78, शेवगाव 48, कर्जत 56, जामखेड 49, श्रीगोंदा 59 अशा एकूण 766 ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. परंतु या टप्प्यात प्रशासक नेमण्याबाबतचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

- Advertisement -

प्रशासकाला सरपंचाप्रमाणेच ग्रामपंचायत स्तरावरचे सर्व निर्णय घेता येणार आहेत. त्यानुसार गावातील विकासकामे, ग्रामसभा, तसेच इतर योजनांची अंमलबजावणी करता येणार आहे. यात ग्रामसेवकाचे अधिकार पूर्वीप्रमाणेच असतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या