
कोहिमा | Kohima
नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले होते. भाजपा आणि एनडीपीपीच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर त्यांचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट असतानाच आता विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनंही भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
नागालँडमध्ये (Nagaland) एनडीपीपी-भाजप (BJP) युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. यात एनडीपीपीने २५ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने १२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे.
यानंतर आता विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेससह जनता दल युनाटेड आणि इतर पक्षांनीही एनडीपीपी-भाजप आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे नागाँडमध्ये विरोधी पक्षच अस्तित्वात नसणार आहे. २०१५ आणि २०२१ मध्येही राज्यात विरोधक नसलेलं सरकार होतं. मात्र नव्या सरकारच्या शपथविधीपूर्वीच सर्व पक्षांनी बहुमत असलेल्या आघाडीला पाठिंबा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
२०१४ मध्ये महाराष्ट्रात निवडणुकीचे निकाल आल्यानंतर मतमोजणीवेळीच शरद पवारांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा देऊ असं म्हटलं होते. २०१९ च्या निवडणुकीच्या नंतर पहाटेचा शपथविधीही खूप गाजला होता. शरद पवारांच्या सांगण्यावरूनच हा शपथविधी झाल्याचं देवेंद्र फडणवीसांनी दावा केला होता. तर राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी केलेली ही खेळी असू शकते असं विधान NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते.
त्यातच शरद पवार महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात विरोधकांच्या एकीसाठी प्रयत्न करत असतानाच आता राष्ट्रवादीनं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं पवारांची मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. याशिवाय नागालँडमधील राजकीय हालचालींचा परिणाम महाराष्ट्रातील राजकीय घडामोंडीवरही होणार असल्याचं बोललं जात आहे.