Cruise Drugs Case : भाजप नेत्याशी संबंधित असल्यामुळेच NCB ने 'त्या'ला वाचवले; नवाब मलिक यांचा थेट आरोप

Cruise Drugs Case : भाजप नेत्याशी संबंधित असल्यामुळेच NCB ने 'त्या'ला वाचवले; नवाब मलिक यांचा थेट आरोप

मुंबई l Mumbai

NCB ने ३ ऑक्टोबर रोजी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Cruise Drugs Case) एकूण ११ लोकांना अटक केली होती. मात्र काही तासातच त्यातील तीन लोकांना सोडून देण्यात आले. रिषभ सचदेवा, प्रतिक गाभा (Prateek Gaba) आणि आमीर फर्निचरवाला (Amir Furniturewala) या तिघांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले. यापैकी रिषभ सचदेवा (Rishabh Sachdeva) हा भाजपच्या (BJP) युवा मोर्चाचे (Yuva Morcha) माजी अध्यक्ष मोहित कंबोज ऊर्फ मोहित भारतीय यांचा मेव्हणा आहे. रिषभला अटक केल्यानंतर भाजपची सूत्र हलली आणि या तिघांना सोडून देण्यात आले, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. हे सर्व प्रकरण महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

ज्यादिवशी NCB ने क्रूझवर छापेमारी केली. त्यादिवशी NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी आठ ते दहा लोकांना ताब्यात घेतले आहे. मात्र त्या रात्री ११ लोकांना अटक करण्यात आली होती. वानखेडे हे एक जबाबदार अधिकारी असूनही त्यांनी बेजबाबदार वक्तव्य केले, असे नवाब मलिक म्हणाले. तसेच आता हे प्रकरण अधिक गंभीर बनले असून याची तटस्थ समितीकडून चौकशी झाली पाहीजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणाची माहिती देणार असल्याचेही ते म्हणाले.

पुढे माहिती देताना ते म्हणाले की, रिषभ सचदेवा हा भाजपच्या मुंबई युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज ऊर्फ मोहित भारतीय यांचा मेव्हणा आहे. रिषभ सचदेवाने भाजपचा स्कार्फ घालून भाजपचा प्रचार करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. तसेच राष्ट्रपतीच्या हस्ते त्याने पुरस्कार देखील घेतला आहे. त्या रात्री रिषभ सचदेवांना देखील अटक करण्यात आली, मात्र दोन तासानंतर त्यांना सोडण्यात आले. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे वडील आणि काका उपस्थित होते.

आमीर फर्नीचरवाला आणि प्रतिक गाभाच्या निमंत्रणावरच आर्यन खान क्रूझवर आला होता, अशी माहिती वकील मानेशिंदे यांनी कोर्टात दिली आहे. आता अटकेत असलेल्या लोकांच्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारावर खटला सुरू आहे. मग NCB ने सोडून दिलेल्या तीन मुलांचे फोन जप्त केले आहेत का? या मुलांचाही फोन तपासावा. तसेच अटकेत असलेले लोक आरोपी आहेत की नाही? हे न्यायालय ठरवेल. पण अटकेचे हे पूर्ण प्रकरण कट-कारस्थान आहे. सोडलेल्या तिन्ही मुलांचे तसेच झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे कॉल रेकॉर्डिंग काढावे, अशी मागणी आम्ही महाराष्ट्र पोलिसांकडे करत आहोत.

फरार आरोपी NCB चा साक्षीदार कसा?

के.पी. गोसावी हा क्रूझ ड्रग्जच्या दोन प्रकरणात साक्षीदार आहे. मुनमुन धमेचा आणि आर्यन खान प्रकरणात त्याने कोर्टात दोन वेगवेगळे पत्ते दिले आहेत. के.पी. गोसावी हा पुण्यातील फराजखाना पोलीस स्थानकात फरार आरोपी म्हणून नोंद आहे. मग आधीच आरोपी असलेल्या व्यक्तीला NCB ने साक्षीदार कसे केले? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणत आहेत की, माझ्याकडे माहिती असेल तर ती NCB ला द्यावी. पण ज्या यंत्रणेवर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, त्यांनाच जाऊन माहिती देणे हे समंजस पणाचे लक्षण नाही. आम्ही मागणी करतो की, भाजपनेच NCB च्या या कारवाईवर एखादी समिती बसवून चौकशी करण्याची मागणी करावी.

Related Stories

No stories found.