
कोपरगाव | तालुका प्रतिनिधी
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी शनिवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानी हे वर्षा या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी गेले होते. या दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे.
या भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. माध्यमांमध्ये या भेटीची चर्चा होऊ नये यासाठी रात्री उशिरा भेटीची वेळ ठरविण्यात आली होती अशी माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि अंबानी यांच्यात नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याचं कारण गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अदानी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी यांची भेट झाली होती. महाविकास आघाडी सरकार काळात धारावी पुनर्विकासासाठी काही बैठका घेण्यात आल्या होत्या. या प्रकल्पासाठी अदानी उद्योग समूहाचे नाव चर्चेत होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे बोलले गेले होते.