कोणते मंत्री, कुठे फिरतात हे मुख्यमंत्र्यांनाच माहिती नसते

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा राज्य सरकारला टोला
कोणते मंत्री, कुठे फिरतात हे मुख्यमंत्र्यांनाच माहिती नसते

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, मात्र दुर्दैवाने राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे येथे कोणाचा मंत्री कुठे फिरत आहे आणि काय निर्णय देतोय, हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती नसते, असा टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला.

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ते बुधवारी आले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन त्यांनी करोना उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने सरकार रोज नवे नियम काढत आहे. राज्याचे सचिवही वेगळा नियम काढतात तर मुख्यमंत्री वेगळाच जीआर काढतात. महसूलमंत्र्यांचेही वेगळेच सुरू असते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी एवढेच काय तर गावचे सरपंच सुद्धा वेगळा नियम काढत आहेत. त्यामुळे राज्यात मंत्री लॉक झाले आणि जनता अनलॉक झाली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोण कुठे चालले, याचा काही पत्ता नाही.

करोनाच्या अनुषंगाने नगर जिल्ह्याचा विचार करता केंद्राच्या निधीतून 50 व्हेंटिलेटर मिळणार आहेत. या शिवाय केंद्र सरकारकडून राज्यातील रुग्णालयांना वेगवेगळे वैद्यकीय साहित्य दिले जात आहेत. पीपीई कीट, मास्क दिले जात आहेत. त्यामुळे राज्य सरकारला थेट आर्थिक साहाय्य करण्याची गरजच काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर सदोष असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्याबाबत विचारता, खा. विखे म्हणाले, मी डॉक्टर आहे. मला व्हेंटिलेटरबाबत तसे काहीच वाटले नाही. व्हेंटिलेटर सदोष असल्याचे ते कोणत्या निकषावर सांगतात? त्यांच्याकडे तसा काही अहवाल आहे का? उलट ग्रामीण भागामध्ये जेवढे व्हेंटिलेटर आहेत, ते केंद्र सरकारच्या निधीतील असून ते लावल्यामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी आमच्यापर्यंत आली नसल्याचे खासदार विखे म्हणाले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com