Saturday, April 27, 2024
Homeराजकीयपंतप्रधान नरेंद्र मोदींची काळजी वाटते - सुप्रिया सुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळजी वाटते – सुप्रिया सुळे

पुणे |प्रतिनिधी| Pune

पंतप्रधान मोदींना ग्रामपंचायत असो किंवा संसद निवडणूक सर्वत्र प्रचारासाठी पळावं लागतं. त्यांची ही धावपळ पाहून मला त्यांची काळजी वाटते, असा उपरोधिक टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. सध्या भाजपजवळ नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पूर्वी भाजपकडे मोठी फळी होती. आता ती दिसत नाही असा चिमटाही सुप्रिया सुळे यांनी काढला.

- Advertisement -

खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन मतदार संघातील प्रश्नाबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौर्‍यावर आले होते. मोदींच्या या मुंबई दौऱ्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने त्यांचे आम्ही स्वागतच करतो. भाजपामध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, यशवंत सिन्हा,सुषमा स्वराज यांच्यासारखे मोठे नेते पाहिले आहे.

मात्र आज यांसारखे नेते भाजपाकडे नाहीत. हे पाहून वाईट वाटत आहे. बिच्चारे पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळजी वाटते की, सरपंचपदाच्या निवडणुकांपासून देशातील कोणत्याही निवडणुकांसाठी मोदींना धावपळ करावी लागते आणि ते पक्षासाठी खूप कष्ट घेतात.प्रत्येक निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींशिवाय भाजपाकडे दुसरा नेता किंवा पर्याय नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळे टोला लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दावोसला जाण्याची गरजच नव्हती

हैदराबादेतील उद्योजकांशी करार करण्यासाठी स्वीत्झर्लंडमधील दावोस येथे जाण्याची गरज नव्हती. मुंबईत बसूनही उद्योजकांना बोलावले असते तर करार झाले अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्‍यावरून केली. पण तरीही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या दावोस दौऱ्याचे शेअर केलेले फोटो आणि विमान छान होते अशा शब्दांत सुळे यांनी शिंदेंवर निशाणा साधला. 

माथाडी कामगार नेत्यांच्या त्रासामुळे उद्योग बाहेर गेल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्‍यात ८८ हजार ४२० कोटींचे करार झाला आहे.त्यामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळतील अस म्हटलं जात आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात सर्वाधिक उद्योग आले आहेत.अनेक आकडेवारी मधून समोर आले आहे.त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची विधान करणे योग्य नसून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आहे.हे लक्षात घेता,देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे कसे कमी होतील, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार आणि शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई या दोघांच्या फोटोवरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे. त्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्या घरच्यांविषयी बोलल्याशिवाय बातमी होतच नाही. तुम्हाला माझा उद्धटपणा वाटेल, पण तुम्हाला हात जोडून म्हणते की, तो माझा उद्धटपणा नाही. त्यामुळे मी प्रांजळपणे सांगते. आमच्या घरातील कोणाचा तरी कोणा सोबत फोटो होत असेल आणि त्याची बातमी होत असेल तर होऊ द्या. चॅनेल पण बिझी राहतील आणि त्यांना पण पब्लिसिटी मिळते. एवढं तरी माणसानं दिलदार असलं पाहिजे, अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या बारामती दौऱ्याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, “जे कोणी नेते बारामतीमध्ये येतात. त्या सर्व नेत्यांचे आम्ही स्वागतच केले आहे आणि त्यांचेही अर्थातच स्वागतच होईल. आमच्यावर अतिथी देवो भव असे संस्कार झाले आहेत. 

मागील अनेक महिन्यापासून जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी ईडी सरकारकडे करीत आहोत. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडणुका घेत नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक भरडला जात आहे. नगरसेवक नाहीत त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांनी प्रश्न कोणाकडे घेऊन जायचे. या गोष्टीच उत्तर ईडी सरकारने द्यावे, यावर हे सरकार भूमिका मांडणार नाही. त्यामुळे या ईडी सरकार निषेध व्यक्त करित खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारचा निषेध नोंदविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या