Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याखा.सुळेंचा सरकारला इशारा, तुम्ही छत्रपतींच्या विरोधात असाल तर...

खा.सुळेंचा सरकारला इशारा, तुम्ही छत्रपतींच्या विरोधात असाल तर…

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

आम्हाला तुरुंगात जावे लागले तरी आम्ही जाऊ. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj)अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. जितेंद्र आव्हाड ( Jitendra Aavhad ) यासाठी तुरुंगात जात असतील तर आव्हाड यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे या सरकारने आपण नक्की कुणाच्या बाजूने आहात याचे उत्तर दिले पाहिजे. तुम्ही छत्रपतींच्या विरोधात जर असाल तर स्पष्ट करा मग आम्ही ही लढाई पूर्ण ताकदीने लढू, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule, NCP )यांनी शुक्रवारी दिला.

- Advertisement -

ठाण्यातील विवियाना मॉल (Viviana Mall)येथे छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘हर हर महादेव’ ( ‘Har Har Mahadev’ Movie )या चित्रपटाचा खेळ सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्ह्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर आज वर्तकनगर पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली. या अटकेच्या कारवाईवर सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या राज्यात काय सुरु आहे. जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि एखादा आंदोलन करतो त्याला शिक्षा म्हणजे ब्रिटिश राज सुरू आहे का? असा सवालही सुळे यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात चित्रपटात चुकीचे दाखवले जात असेल आणि एखादी व्यक्ती त्या विरोधात वेदना मांडत असेल, त्यासाठी त्यांना अटक होत असेल तर या अटकेचे मनापासून स्वागत करत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.जितेंद्र आव्हाड यांनी असे काय केले की त्यांना थेट अटक केली जात आहे. माध्यमांच्या व्हिडीओमध्ये जितेंद्र आव्हाड मारामारी करताना दिसत नाहीत. ते हात बांधून उभे आहेत. ते सगळ्यांना गप्प रहा असे सांगत आहेत, असे सुळे म्हणाल्या.

छत्रपती शिवाजी महाराज ही आमची आन, बान, शान आहेत. त्यामुळे छत्रपतींचा अपमान होत असेल तर ते दुर्दैवी आहे. सत्ता काबीज करण्यासाठी माणसाने पातळी किती सोडावी हे महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपतींबद्दल तुम्ही चुकीची माहिती देणार असाल तर ते अयोग्य आहे आणि त्याचा विरोध केलाच पाहिजे. चुकीच्या माहितीआधारे विकृती दाखवू नका, इतिहास खरा दाखवा असे आवाहनही त्यांनी केले.

आपण छत्रपतींना न्याय दिला पाहिजे हीच स्वाभिमानी महिला म्हणून माझी माफक अपेक्षा आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास कोण दाखवेल त्याला छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी सुनावले.

- Advertisment -

ताज्या बातम्या