अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना उत्तरेतील ठराविक राज्यांतील ठराविक शेतकर्यांचाच विरोध आहे.

या विरोधात राजकारणही शिरले असून महाराष्ट्रासह बहुतांश राज्यातून या कायद्यांना विरोध नाही. हे जाणून घ्यायचे असेल तर राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्याकडे बाजार समित्यांचा बंद पाळून दाखवावा, असे आव्हान भाजपचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.

नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे म्हणाले, केंद्र सरकारने केलेले कायदे चांगलेच आहेत. जरी त्यात काही त्रुटी वाटत असतील तर त्यात दुरूस्ती करण्याची सरकारची तयारी आहे. यासंबंधी आंदोलनांसोबत आठ ते दहा वेळा चर्चा झाली आहे. मात्र, शेतकर्यांचे एकमुखी नेतृत्व नाही. त्यामुळे त्यांना ही तडजोड मान्य होत नाही.

महाराष्ट्राच्या सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आंदोलनास पाठिंबा असल्याचे सांगतात. मात्र, ज्या दिवशी यासाठी बंद पाळण्यात आला, त्या दिवशी आपल्याकडील सर्व बाजार समित्या आणि शेतकर्यांचे व्यवहार सुरळीत होते. त्यांच्याच ताब्यातील बाजार समित्या ते बंद ठेवू शकत नाहीत. जर खरेच त्यांचा विरोध असेल तर त्यांनी शेतकर्यांना सांगून असा कडकडीत बंद पाळून दाखवावा, असे माझे त्यांना आव्हान आहे.

मात्र, हे त्यांना शक्य नाही. एका बाजूला फायद्यासाठी हे व्यवहार सुरळीत ठेवायचे आणि दुसरीकडे विरोध दाखवायचा, अशी दुटप्पी भूमिका या नेत्यांची आहे, असा आरोप खासदार विखे यांनी केला.

महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या भूमिकेबद्दल विखे म्हणाले, आपल्या राज्यातील शेतकर्यांचा या आंदोलनाला पाठिंबा नाही. येथून जे शेतकरी पाठिंबा देण्यासाठी गेल्याचे सांगतात, तेही राजकीय नेत्यांच्या मदतीने गेलेले आहेत. सामान्य शेतकर्यांना या कायद्यातील तरतुदी आणि केंद्र सरकार घेत असलेले निर्णय पटत आहेत. कोणाच्या सांगण्यावरून ते भडकत नाहीत. कांद्याचा एवढा मोठा मुददा झाला होता, तरीही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली.

कांद्याच्या बियाण्याची टंचाई निर्माण झाली होती, एवढा शेतकर्यांचा कांद्याकडे ओढा आहे. आता मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. त्यामुळे पूर्वी घालण्यात आलेली निर्यात बंदी आता उठविण्यात येईल. यासाठी आपणच पुढाकार घेणार असून जानेवारीत ही बंदी मागे घेण्यासंबंधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत.

अण्णा हजारेंच्या सूचनांचे स्वागतच

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या आंदोलनासंबंधी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, शेतकर्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारची काय भूमिका आहे, काय काम सुरू आहे. यासंबंधी हजारे यांना माहिती देण्यात आली आहे. ज्या कायद्यांना पंजाबच्या शेतकर्यांचा विरोध आहे, त्या कायद्याची माहितीही हजारे यांना देण्यात आली आहे. ती वाचून त्यांचेही नक्कीच समाधान होईल. उलट त्यावर त्यांनी काही सूचना केल्या तर त्या सरकारला कळवून त्यानुसार दुरूस्तीही करून घेता येईल. त्यामुळे हजारे टोकाची भूमिका घेतील असे वाटत नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीबाबत बोलतांना खा.डॉ. विखे म्हणाले, दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन, पश्चिम बंगालचा दौरा अशा व्यग्र दिनक्रमातही शहा यांनी आम्हाला भेटीसाठी वेळ दिली. मी कार्यकर्त्यांच्या मनातील मंत्री आहे. त्यामुळे मला पदाची चिंता नाही. पक्षाच्या माध्यमातून काम करीत राहणे हीच आपली भूमिका आहे. दिल्लीत शहा यांची भेट ही वेगळ्या कारणांसाठी होती. अशा चर्चा उघड करता येत नसतात. राज्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी, सरकारचे काय चालले आहे, आपल्या पक्षाचे काम जाणून घेणे, पुढची धोरणे आखण्यासाठी मुद्दे जाणून घेणे यासाठी पक्षश्रेष्ठी बोलावत असतात. तेव्हा आपण येथे राज्यात जे पाहिले, जे वाटते हे वरिष्ठांना सांगणे आपले काम असते. बाकीचे निर्णय त्यांनी घ्यायचे असतात,असे डॉ. विखे म्हणाले.