शरद पवार यांनी त्यांचे मंत्री, आमदारांना आवरावे

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत असून, हे मंदिर आपल्या देशाच्या आस्थेचा प्रश्न आहे. त्याचा सर्वांना अभिमान आहे. राष्ट्रवादीने भाजपला सल्ला देण्यापेक्षा गर्दी जमवत दररोज वेगवेगळी भूमिपूजने, उद्घाटने करणार्‍या आपल्या पक्षाचे आमदार व मंत्र्यांवर नियंत्रण आणले पाहिजे, असा टोला खासदार डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.

खा. डॉ. विखे सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये बैठकीच्या निमित्ताने आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना श्रीराम मंदिर भूमिपूजनवरून भाजपवर टीका करणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. महाविकास आघाडीचे कितीतरी मंत्री सध्या त्यांच्या मतदारसंघात रस्ते, बंधारे या कामांचे भूमिपूजन, जलपूजन, उद्घाटने करू लागले आहेत.

करोना असल्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी हे थांबवले पाहिजे. स्वतःच्या पक्षाचे आमदार, मंत्र्यांकडून होणारे भूमिपूजने, उदघाटने थांबवा आणि मग भाजपला सल्ला द्यावा. भाजपने जे भूमिपूजन हाती घेतले आहे, तो भारत देशाच्या आस्थेचा प्रश्न आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्ही गेली कित्येक वर्षे ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, ज्यामध्ये एक पिढी गेली, त्या राम मंदिराचे निर्माण आता सुरू होत आहे. त्यामुळे त्यावर टीकाटिप्पणी करण्याची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले.

नगरमध्ये लॉकडाऊन करा, हे मत मी खासदार नव्हे, तर डॉक्टर या नात्याने व्यक्त केले होते. करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता तर लोकप्रतिनिधीना करोनाग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये फोन करावे लागतात. सध्या मी एकटा पडलो असून प्रशासनानपुढे हतबल झालो असल्याचे डॉ. विखे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात करोनाची परिस्थिती गंभीर आहे. मी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टर या नात्याने लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

जनतेने आता स्वतःच जनता कर्फ्यू लावून घरात थांबणे गरजेचे आहे. सध्या करोना बाधित व्यक्तींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होत नाही. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन लोकप्रतिनिधींना येतात. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्यावे, यासाठी आम्हला फोन करावे लागत आहेत.

वेळीच जनता कर्फ्यूची आवश्यकता आहे. परंतु प्रशासन काहीतरी चुकीची माहिती देत असल्याचा आरोपही खा. विखे यांनी केला. 1 ऑगस्ट रोजी भाजपच्या वतीने करण्यात येणार्‍या दूध आंदोलनाबाबत विचारले असता ते म्हणाले, सध्या शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट आहे. दूध दरवाढ गेल्या काही महिन्यांपासून रखडली आहे. त्यामुळे दुधाला किमान 10 रुपये अनुदान देणे आवश्यक आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *