
मुंबई | Mumbai
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मातोश्रीवर घडलेल्या प्रसंगाबद्दल नवा खुलासा केला आहे.
भाजप-शिवसेना (shivsena and bjp alliance) दरम्यान २०१९ मध्ये झालेल्या युतीच्या बैठकीदरम्यान ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री ठरले होते, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मात्र शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) हा दावा खोडून काढत रावसाहेब दानवेंवर खोचक टीका केली आहे.
२०१९ च्या बैठकीदरम्यान ५०-५० टक्के म्हणजेच अडीच वर्ष शिवसेना-अडीच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री असं ठरलं होतं. मात्र रावसाहेब दानवे हे सध्या जालन्याचे खासदार आहेत. २०२४ मध्ये निवडून येतील की नाही, याची खात्री नाही. त्यामुळे ते असं भ्रमिष्टासारखं बोलत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. (Sarvamat News)
तसेच, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी युतीच्या फॉर्म्युल्यावर केलेले वक्तव्य चुकीचे आहे. त्यावेळी ते निर्णय प्रक्रियेतच नव्हते. असा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. हॉटेल ब्लू सी परळीच्या पत्रकार परिषदेत अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेले निवेदन ऐकले असेल, तर रावसाहेब दानवे कुठेतरी पाताळात फिरतायत, पृथ्वीवर यायचे आहेत, असेच दिसेल, असा टोला लगावत दानवे माझ्या बाजूलाच राहतात, त्यांना ती क्लिप पाठवतो, असे संजय राऊत यांनी सांगितले.
रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले होते?
भाजपने मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेला शब्द पाळला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणतात. पण तेव्हा मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्यावेळी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मला फोन आला. आपल्याला शिवसेनेसोबत युतीची चर्चा करायची आहे, असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर आम्ही ही चर्चा करण्यासाठी एक टीम तयार केली. या टीममध्ये मी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या आणखी काही नेत्यांचा समावेश होता. अमित शहा मुंबईत आले त्यावेळी आम्ही शिवसेनेशी काय बोलायचे, याबाबत चर्चा केली. सर्वकाही ठरवून आम्ही मातोश्रीवर गेलो. तिथे शिवसेनेचे काही नेतेही उपस्थित होते. काहीवेळ आमच्यात चर्चा झाल्यानंतर उद्धवजी अमितभाईंना म्हणाले की, 'अपून दोनो जरा अंदर बैठेंगे'. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा आतल्या खोलीत गेले, आम्ही बाहेरच बसून होतो, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
काहीवेळानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा बाहेर आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीच पत्रकारपरिषद घेऊ या, असे म्हटले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा काही विषयच काढला नाही. त्यानंतर आम्ही ठरवल्याप्रमाणे पत्रकारपरिषद घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आतल्या खोलीत काय चर्चा झाली, हे आम्हाला सांगितले नाही. पण सह्याद्री अतिथीगृहावर गेल्यानंतर अमित शहा यांनी मला सगळे काही सांगितले. उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या जागावाटपाचा आणि मुख्यमंत्रीपदाचा विषय काढला होता. पण मी त्यांना सांगितलं की, शिवसेना-भाजपची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ही युती केली आहे. युतीचा फॉर्म्युला तेव्हाच ठरला होता. ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मु्ख्यमंत्री, हे तेव्हाच ठरले होते. या फॉर्म्युलात काहीही मोडतोड करायची नाही, असे अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.