ठाकरे गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरचा प्रवास घातक ठरणार - गजानन कीर्तिकर

ठाकरे गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरचा प्रवास घातक ठरणार - गजानन कीर्तिकर

पुणे |प्रतिनिधी| Pune

शिवसेनेच्या ठाकरे गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जो राजकीय प्रवास सुरू आहे तो घातक ठरणार आहे. त्यामुळेच शिंदे गटाने उठाव केला. बाळासाहेब ठाकरे गटात जे खासदार गेले त्याचंही तेच कारण आहे आणि मी सुद्धा शिंदे गटात गेलो त्याचंही तेच कारण आहे”, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात नुकतेच गेलेले खासदार गजानन कीर्तीकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटात आपल्याला डावललं जात होतं. मी तिथे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होतो, असा आरोपही गजानन कीर्तीकर यांनी केला.

खासदार गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ धरली. उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा खूप मोठा झटका मानला जात आहे. गजानन कीर्तीकर यांनी आपण शिंदे गटात का प्रवेश केला? याबाबत पुण्यात पत्रकार परिषदेत माहिती दिली.

कीर्तिकर म्हणाले, अडीच वर्ष सरकार होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आम्हाला दुय्यम स्थान मिळत होतं. अधिकारी जुमानत नव्हते. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं प्रस्थ सुरू होतं. पडलेल्या पदाधिकाऱ्यांना निधी मिळत होता.

मी नगरच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आदेशानुसार तहसीलदार, ठाणेदार, एमएसईबीचे अधिकारी त्यांचं जे काम करतील त्यांच्या नेमणूका करण्यात आल्या. हा सगळा प्रकार आम्ही उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवत होतो. त्यांना आवाज देत होतो. आम्ही एकमुखी मागणी केली की, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जो प्रवास सुरु आहे तो थांबवा, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.

महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सुरू झाली तेव्हा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची गळाभेट घ्यायला गेले. दिशाहीन झालेली काँग्रेस, स्वार्थी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर युती करणं चुकीचं आहे, असं ते म्हणाले.

मी २०४४  साली जेव्हा निवडणूक लढत होतो तेव्हा उद्धव ठाकरे माझं तिकीट कापण्याचं काम करत होते. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले की तिकीट दिलं पाहिजे, असं गजानन कीर्तीकर यांनी सांगितलं. मी नोकरी सोडून पक्षाचं काम करत होतो. त्यांनी मला २००४ ला तिकीट दिलं. पण उद्धव ठाकरे विरोध करत होते. अखेर २००९ ला माझं तिकीट कापलं. माझ्या पीएला बोलावून तिकीट कापल्याचं सांगितलं, असं कीर्तीकर म्हणाले. माझं तिकीट कापलं पण माझ्या ज्युनिअर सहकाऱ्याला मंत्रीपद दिलं. अरविंद सावंतांना दिलं. एनडीएतून बाहेर पडताना सचिवाला विनायक राऊतांना गटनेता केलं. माझ्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला डावललं, अशी खंतही गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केली.

उद्धवजींनी जी संघटना चालवली त्यामध्ये मी काम केलं. पण माझं पुण्यातील काम खंडीत केलं. आणि सिनेअभिनेत्याला आणलं. खासदार अमोल कोल्हेंना काम दिलं. पुणे जिल्ह्यात कार्यकर्ते आहेत. अमोल कोल्हे मालिकेमुळे  लोकप्रिय झाले आणि आढळराव हरले, असं कीर्तीकर म्हणाले.

औरंगाबादमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या विरोधात रावसाहेब दानवेंचा जावई उभा राहिला आणि पैशांचा वापर केल्यामुळे हरला. त्यांनी खैरेंना राज्यसभा द्यायला हवी होती. मात्र प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभा दिली. काँग्रेसचे नेते सांगतात की त्यांना साधी विधानपरिषदही दिली नसती. मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होतो, असा दावा गजानन कीर्तीकरांनी केला.

मुलगा अमोल कीर्तीकर यांच्याबद्दल विचारले असता कीर्तिकर म्हणाले, तो माझ्या हातात हात धरून राजकारणात आला नाही. आमचं घरामध्ये ठरलं आहे. आमच्या घरात वाद नाही. तो मला म्हटला की मी शिवसेना सोडणार नाही. रोज आम्ही एकत्र बसतो आणि जेवण करतो. मी त्याला ये म्हणून सांगणार नाही. त्याचा त्याला अनुभव घेऊ दे, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com