ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 'मनसे'ने कंबर कसली; राज ठाकरेंनी दिले 'हे' आदेश

नुकताच राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 'मनसे'ने कंबर कसली; राज ठाकरेंनी दिले 'हे' आदेश

मुंबई | Mumbai

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी, भाजप, वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मनसेनेही कंबर कसली आहे. या निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मनसेने आपल्या धोरणांत अमुलाग्र बदल केले आहेत. शक्य ते शिवसेनेची कोंडी करण्याचा पक्षाचे प्रयत्न दिसून येतात. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाने आता ग्रामीण भागातही लक्ष देण्यास सुरवात केल्याचे दिसून येते. राज्यातील सुमारे चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. वास्तविक पहाता ग्रामपंचायत निवडणुका तांत्रिकदृष्या पक्षीय पातळीवर लढल्या जात नाहीत. त्यामध्ये पक्षाचे चिन्ह नसते. तरीही विविध पक्षांचे म्हणून पॅनल तेथे तयार केले जातात. एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या ग्रामीण भागात अलीकडेच भाजपचाही शिरकाव झाला आहे. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून एकत्रित निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बैठकीत तसे जाहीरही केले होते. त्यामुळे बहुतांश गावांत महाविकास विकास आघाडी विरूद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होत आहे. या निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करून त्यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणावेत, असा आदेश पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनी आपल्या भागातील ग्रामपंचायतींमध्ये पक्षाचे उमेदवार उभे करावेत. त्यांच्या याद्या पक्षाच्या मुख्यालयात पाठविण्यात याव्यात, असे नांदगावकर यांनी पत्रात म्हटले आहे.

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com