चिंचवड, कसब्यात भाजपला मनसेचा पाठिंबा; 'बोलघेवडे पोपट' म्हणत राष्ट्रवादीचा हल्लाबोल

चिंचवड, कसब्यात भाजपला मनसेचा पाठिंबा; 'बोलघेवडे पोपट' म्हणत राष्ट्रवादीचा हल्लाबोल

पुणे | Pune

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. पोटनिवडणुकीत कसब्यात भाजप विरुद्ध काँग्रेस तर चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत आहे.

दरम्यान कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राजकारण तापलं असताना मनसेनं (MNS) तटस्थ भूमिका स्वीकारली होती. मात्र, आता मनसेनं आपले पत्ते खोलले असून दोन्ही ठिकाणी भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. मनसे भाजपला पाठिंबा देणार आहे. मात्र, प्रचारात सहभागी होणार नाही, असं मनसे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितलं.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेनं घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मनसेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी समाजमाध्यमावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

"बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत," अशा शब्दात प्रशांत जगताप यांनी मनसेवर टीका केली आहे. "गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून राष्ट्रवादी आणि कॉग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहेत," असे जगताप यांनी म्हटलं आहे.

याआधी राज ठाकरे यांनी या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असे मत व्यक्त केले होते. अशा आशयाचे पत्र देखील त्यांनी सर्व पक्षातील नेत्यांना पाठवले होते. पण या पत्राला कोणत्याही पक्षाकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे आता मनसेकडून भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये या विधानसभेच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरातील कोणत्याही सदस्याला उमेदवारी न दिल्याने जनतेकडून नाराजी व्यक्त कऱण्यात आली आहे. भाजपने या मतदारसंघात हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर ही निवडणूक लढवणार आहेत.

तसेच चिंचवड विधानसभेत तिहेरी लढत होणार असल्याचे सध्या दिसून येत आहे. या मतदारसंघातून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. परंतु महाविकास आघाडीने तिकीट नाकारल्याने राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com