
पुणे(प्रतिनिधी)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध करणारे भाजपचे खासदार ब्रुज भूषण सिंह हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने १५ जानेवारीला पुण्यात येत आहेत.
त्यांच्याबाबत मनसे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेले असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्याबद्दल मवाळ भूमिका घेतली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सिंह यांच्या पुणे दौऱ्याविषयी कुठल्याही मनसे नेता-पदाधिकाऱ्याने काहीही बोलू नका, असे आदेश राज ठाकरेंनी दिल्याचं पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरेंनी सांगितलं.
यापूर्वी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. मात्र काही काळानंतर त्यांचा विरोध मावळला होता. आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने बृजभूषण सिंह पुण्यात येत आहेत. १५ जानेवारीला त्यांचे आगमन होईल. मात्र सिंह यांच्या पुणे दौऱ्याविषयी कुठल्याही मनसे नेता-पदाधिकाऱ्याने काहीही बोलू नका, असे आदेश राज ठाकरेंनी दिल्याचं वसंत मोरेंनी सांगितलं.
बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येऊ दिलं नाही, असा काही विषय नाही, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे अयोध्येला गेले नव्हते. बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्यावर कोणीही बोलू नये, हे आदेश राज ठाकरेंनी दिले असल्याचे मोरे यांनी सांगितले.
दरम्यान,राज ठाकरे विरोध करत नाहीत, ही चांगली गोष्ट आहे. त्यांना माझा सैद्धांतिक विरोध होता. मी इतकंच म्हटलं होतं, की तुम्ही इथल्या संतांची माफी मागा, जनता, मुख्यमंत्री-पंतप्रधान यांची माफी मागा, चूक झाली हे मान्य करा, ही एकच अट होती. मी कुस्तीपटू आहे, देशभरात माझं येणं जाणं असतं, महाराष्ट्रातील कुठल्याही पैलवानाने सांगावं, की नेताजी माझ्यावर प्रेम करत नाहीत, त्यांना मी केवळ खाऊ पिऊच घालत नाही, तर मायाही करतो, असं बृजभूषण सिंह म्हणाले.