
मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्यामुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलेय.
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे (MNS) कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. तर पोलिसांकडून (Police) आंदोलन करणाऱ्यांची धरपकड करण्यात येत आहे. याबाबत राज ठाकरे (Raj Thackeray press) यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
३६५ दिवस भोन्ग्यांना परवानगी कशासाठी असा सवाल करत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. ते म्हणाले, माणुसकीपेक्षा यांचा धर्म मोठा आहे का? निकाल लागेपर्यंत आंदोलन कायम राहणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था फक्त आमच्यासाठीच का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
नियम केवळ हिंदुसाठीच आहेत का? मुंबईमधील १४० मशिदीतील १३५ मशिदीत अजाण लावण्यात आली. यावर काय कारवाई करणार? नोटीस फक्त आमच्यासाठीच का? असाही सवाल राज्य सरकारला ठाकरे यांनी केला.
न्यायालयाच्या आदेशाचे सर्वानी पालन करणे गरजेचे आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसिबलमध्ये आवाज केला पाहिजे. ५५ डेसिबल म्हणजे एका मिक्सरच्या आवाजाच्या इतक्या आवाजात वाजले पाहिजे. आम्ही शांततेत सांगतो आहोत ते समजून घ्या असा इशाराही याप्रसंगी राज ठाकरे यांनी दिला.
तसेच आमच्या लोकांची धरपकड कशासाठी करताय? मोबाइलच्या काळात, संवादाची साधने एवढी असताना माणसं पकडून काय होणार. हे अजून ६०-७० दशकांचा विचार करताय का? एवढा मुर्खपणा… हे कोणत्या काळात जगतायत माहिती नाही, अशी टीका राज ठाकरेंनी यावेळी केली.