“मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि  यशवंतराव चव्हाणही वाचलेत“
“मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचलेत“; राज ठाकरेंचे शरद पवारांना प्रतिउत्तर

“मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचलेत“

राज ठाकरेंचे शरद पवारांना प्रतिउत्तर

पुणे(प्रतिनिधि)

मी प्रबोधनकार ठाकरेही (Prabodhankar Thackeray) वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही (Yashwantrao Chavhan) वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं अशा शब्दांत मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रतिउत्तर दिले आहे. राज ठाकरे पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

एका मराठी वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. “राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झाला आहे. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले होते. “कोण आहे हा जेम्स लेन? त्याने पुस्तक लिहिलं. तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? तो आता कोण आहे? कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणातून हे सगळं डिझाईन झालं आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) इतिहास चुकीचा सांगितला गेला, ते करणारे अमुक जातीचे लोक आहेत वगैरे बोललं गेलं”, असंही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं होतं.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्याबाबत बोलताना शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना, ‘राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे’, असा खोचक सल्ला दिला होता. त्याबाबत विचारले असता राज ठाकरे यांनी वरील उत्तर दिले.

राज ठाकरे म्हणाले, “मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं. एका चॅनलला मी मुलाखत दिली. गेल्या ७५ वर्षांमध्ये आपण काय कमावलं आणि गमावलं याचा उहापोह त्यात होता. मी त्यांना हेच सांगितलं की आपण वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत प्रगत होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी आल्या, तरी आपली प्रगती होणार नाही. आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का? या अनुषंगाने माझी भूमिका होती”.

यापूर्वी जातीजातीत मतदान व्हायचं. पण राष्ट्रवादीच्या जन्माननंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष वाढला. हे सर्वांना माहिती होतं. बोललो फक्त मी. यावर मला सांगितलं जातं प्रबोधनकारांचं पुस्तक वाचा. मी सर्वांची पुस्तकं वाचले आहेत. प्रबोधनकारांचे संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे. त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असं त्यांनी सांगितलं.प्रबोधनकार तुम्हालाही परवडणार नाही. उगाच मध्येमध्ये प्रबोधनकारांना आणू नका. त्यांना आणायचं तर पूर्ण आणा. म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही कोठे आहात ते, असंही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले, जात-धर्माच्या आधारे नाही. लोक विकासाच्या मुद्द्यावरही मतदान करतात हे दिसलं. पण मी मुलाखतीत एका मुद्द्याच्या अनुषंगाने बोललो. आता काय चाललंय तर जातीचं वातावरण तयार करण्यात येतं आहे.. मी शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली होती. त्यावर पत्रकार म्हणाले, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. पण त्याचा काय संबंध? मी त्यांच्या वाढदिवसाला भाषण केलं होतं. त्याची सुरुवात होती, आजचा दिवस पाहता काही गोष्टी या राखूनच ठेवल्या पाहिजेत, वाढदिवशी आपण चांगलं बोलतो. मग म्हणजे काय भूमिका बदलली का? असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी केला.

जात पाहून बाबासाहेबांना भेटत नाही

मी बाबासाहेब पुरंदरेंना भेटतो. ते शिवशाहीर म्हणून भेटतो. ब्राह्मण म्हणून भेटत नाही. शरद पवारांना भेटतो तेव्हा मराठा म्हणून भेटत नाही. तुम्हाला भेटतो तेव्हा तुमची जात पाहून भेटत नाही. आपण यातून बाहेर पडलं पाहिजे, असं सांगतानाच मी काय वाचतो आणि काय वाचलं पाहिजे हे मी आणि माझ्या पक्षाला माहीत आहे. मला कुणी मोजण्याचं काम करू नका, असा टोला त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांना नाव न घेता लगावला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com