Thursday, April 25, 2024
Homeराजकीयराज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर

राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई l Mumbai

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांची १५ हजाराच्या जामीनावर सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे रोजी असणार आहे.

- Advertisement -

या खटल्यात सुनावणीला सुरुवात करण्यासाठी राज ठाकरे यांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने काढले होते. त्यानुसार शनिवारी राज ठाकरे वाशी न्यायालयात हजर झाले. यावेळी वाशी न्यायालयाने राज ठाकरे यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यावेळी मी भाषण केले आहे, मात्र मला गुन्हा मान्य नाही, असे राज ठाकरे यांनी सुनावणीदरम्यान न्यायलयाला सांगितले. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ५ मे रोजी होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीदरम्यान राज ठाकरे पुन्हा न्यायालयात हजर राहण्याची गरज नसल्याचे त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात येत आहे.

राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित आहेत. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेकडो कार्यकर्ते नवी मुंबई परिसरात दाखल झाले आहेत. न्यायालयात हजेरी लावल्यानंतर राज ठाकरे हे नवी मुंबई आणि ठाण्यातील आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आगामी निवडणुकांच्या संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण ?

२६ जानेवारी २०१४ रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात भाषण करताना त्यांनी टोकनाक्यांच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते, तसंच टोलनाक्यांची प्रक्रीया पारदर्शक होत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांनी टोल भरु नये, असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यांच्या या भाषणानंतर वाशी येथील टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली, याप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी पोलिसांच्या नोटीसी, समन्सला उत्तरे न दिलेल्या राज ठाकरेंविरोधात कोर्टानं अखेर वॉरंट जारी केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या