सर्व गोष्टी सुरु, मग सणांवरच का येता?; राज ठाकरेंचा सरकारला सवाल

सर्व गोष्टी सुरु, मग सणांवरच का येता?; राज ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) आज राज्य सरकारचे नियम धुडकावत मुंबई मध्ये दहीहंडी (Dahi Handi) सण साजरा करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी मनसैनिकांवर कारवाई करत त्यांची धरपकड केली असून गुन्हे दाखल केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला (MNS chief Raj Thackeray press conference in Mumbai). यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्दयांवर भाष्य केले.

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर करोनाचा (COVID19) प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

राज ठाकरे राज्यतील सण-उत्सवांवरील बंदी आणि मंदिरं उघडण्यावरील निर्बंधांवर बोलताना म्हणाले कि, 'नारायण राणेंच्या विरोधात जे झालं, यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत. बाकीच्या सगळ्यांचे मेळावे सुरु आहेत. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. म्हणजे यांच्यासाठी मंदिरं सुरु, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी मेळावे, सभा घ्यायच्या पण आम्ही दहीडंही साजरी करायची नाही. कुठूनही गर्दी कमी झालेली दिसत आहे का? जन आशीर्वाद यात्रा झाली ती चालली. तेव्हा तुमचा लॉकडाउन (Lockdown) नाही. सण आला की लॉकडाउन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते.'

मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या संदर्भात विचारल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, अस्वलाच्या अंगावर केस किती आहेत हे अस्वल किती मोजत नाही. त्याप्रमाणे आमच्या अंगावर केसेस आहेत. हे सर्व सुडबुद्धीने सुरु आहे, असं ठाकरे म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com