Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमोदींनी राष्ट्रहिताबरोबरच लोकहित साधले - आ. विखे

मोदींनी राष्ट्रहिताबरोबरच लोकहित साधले – आ. विखे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

देशाचा जीडीपी खाली आला म्हणून आरडाओरड करणार्‍यांनी मागील सहा महिन्यांत राज्यातील जनतेला कोणती मदत केली याचे आत्मपरीक्षण करावे,

- Advertisement -

असा सल्ला देतानाच विकास दराचा विचार करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकटाच्या काळात राष्ट्रहिताबरोबरच लोकहित साधले. देशातील सामान्य माणसाला आत्मनिर्भरतेने पुन्हा उभे करण्यासाठी आत्मविश्वास दिला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शिर्डी विधानसभा मतदार संघातील 350 आशा सेविकांना आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने कोव्हिड विमा पॉलिसीचे कवच देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताहाच्या निमित्ताने या पॉलिसीचे वितरण करण्यात आले.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, शिवाजीराव गोंदकर, तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, सभापती नंदाताई तांबे, शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, डॉ. राजेंद्र पिपाडा, सभापती बापूसाहेब आहेर, शहराध्यक्ष अनिल बोठे, शरद थोरात, जि. प. सदस्या कविता लहारे, तहसीलदार कुंदन हिरे, आरोग्य आधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे आदी याप्रसंगी उपस्थित होते. मोफत अपघात विमा योजनेअंतर्गत नऊ कुटुंबियांना सुमारे 18 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण यानिमित्ताने करण्यात आले.

आ. विखे पाटील म्हणाले की, कोव्हिड संकटात स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या संरक्षणासाठी काम करणार्‍या आशा सेविकांकडे राज्य सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. ज्यांच्यावर जबाबदारी होती तेच घरात बसल्यामुळे सामान्य माणसाच्या हितासाठी कोणतेही काम राज्यात झाले नाही. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी निर्णय प्रक्रीया राबविली.

विकास दर खाली आला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने ओरडणार्‍यांनी मागील सहा महिन्यांत राज्यातील जनतेला कोणता दिलासा दिला? याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सामान्य माणसाचा विचार केला.

देशातील जनतेची काळजी घेतानाच चीनसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही नमविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. इतर देशांच्या तुलनेत भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर आणि मृत्युदर खुप कमी आहे. मोदींच्या निर्णय क्षमतेमुळे हा देश संकटातून वाचला. शिर्डी विधानसभा मतदार संघात त्यांचा वाढदिवस आशा सेविकांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. याचे समाधान आ.विखे पाटील यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुरदृष्टी करोना संकटाच्या काळात संपूर्ण देशाला पहायला मिळाली असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक अ‍ॅड. रघुनाथ बोठे यांनी केले. डॉ. प्रमोद म्हस्के यांनी तालुक्यातील करोना परिस्थितीचा आढावा विषद केला.

पंतप्रधान मोदीच्या वाढदिवसानिमित्त राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण करण्यात आले. मुळा-प्रवरा वीज संस्था आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरीअल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सभासदांच्या कोव्हिड चाचणी सेंटरचा शुभारंभ बाभळेश्वर येथे आ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी तुकाराम बेंद्रे, बाळासाहेब म्हस्के, डॉ. दीपक म्हस्के, शंकरराव बेंद्रे, रामचंद्र जवरे, अण्णासाहेब बेंद्रे, साहेबराव म्हस्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या