दूध अनुदान देण्यास काही मंत्र्यांचाच विरोध
राजकीय

दूध अनुदान देण्यास काही मंत्र्यांचाच विरोध

Arvind Arkhade

आश्वी |वार्ताहर|Ashvi

दूध उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान देण्यास सरकारमधील काही मंत्र्यांचाच विरोध आहे. हमीभावासाठी दूध उत्पादकांच्या सुरू झालेल्या आत्महत्यांची दखल घेऊन दूध संघानी आपल्या नफ्यातून दूध उत्पादकांना मदत करावी आणि सरकारने दूधाला 10 रूपयांचे अनुदान तातडीने द्यावे आशी मागणी माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना आ. विखे पाटील म्हणाले की युती सरकारच्या काळात जी मंडळी दुधाच्या अनुदानासाठी विधीमंडळाच्या पायर्र्‍यांवर बसून सरकारच्या विरोधात घोषणा देत होती आज तीच माणसं सतेत आहेत. परंतु त्यांना आपल्याच घोषणांचा सोयीस्कर विसर पडला असल्याचा टोला लगावत आ. विखे म्हणाले की, दूध उत्पादकांची मागणी लक्षात घेऊन शेतकर्‍यांची मागील सरकारने पाच रुपयांचे अनुदान देऊन यासाठी निधीची तरतूद केली. मग आताच्या सरकारला अडचण काय आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दुध उत्पादकांना हमीभाव आणि अनुदान देण्यास या सरकारमधील काही मंत्र्यांचाच विरोध असल्याचा आरोप त्यांनी केला. गेली अनेक वर्षे दूधसंघ चालविणारे आणि, महानंदाची सत्ता ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी तरी अडचणीच्या काळात दूध उत्पादकांच्या पाठीशी उभे राहीले पाहीजे, आजपर्यंत झालेल्या नफ्यातून दूधसंघानी उत्पादकांना मदत करण्याची गरज असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

शेतीच्या कारणाने शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत होत्या आता दूधाला भाव मिळत नसल्याने उत्पादकांच्या सुरू झालेल्या आत्महत्या राज्याला शोभणार्‍या नाहीत. सरकारने अधिक वेळ न घालविता दुध उत्पादकांना 10 रुपयांचे अनुदान द्यावे, ही आमची मागणी कायम आहे. याबाबत निर्णय न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

आघाडी सरकार फक्त घोषणा करीत असून अंमलबजावणी शून्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच सरकार बांधावर खत देणार होते. पण दुकानातच नाही बांधावर मिळणार कधी? शेतातील काम सोडून शेतकर्‍यांना खतासाठी दुकानांसमोर रांगा लावण्याची वेळ आली. बियाणांमध्ये शेतकर्‍यांची फसवणूक झाली. महाबीज कडून फसवणूक व्हावी हे आश्चर्यकारक आहे. दुबारपेरणीचे संकट शेतकर्‍यांसमोर असल्याने सरकारने तातडीने मदत जाहीर करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Deshdoot
www.deshdoot.com