राज्य सरकारने दूध उत्पादकांना न्याय द्यावा – आमदार राजळे

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दूध दरवाढ करून दूधउत्पादक शेतकर्‍यांचा भावना जपल्या होत्या. सध्या दुधाचे दर पाण्यापेक्षाही कमी असून उत्पादन खर्च मिळत नसल्याने दूधउत्पादक शेतकरी आर्थीक संकटात सापडला असल्याने राज्य सरकारने तातडीने दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूध दरवाढ करून न्याय देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

गेल्या पाच महिन्यांपासून दुधाचे दर अत्यंत कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकरी उत्पादन खर्चही मिळत नसल्याने आर्थीक अडचणीत सापडला आहे.दुधाचे दर वाढविण्यात यावे याकरिता प्रदेश भाजपाने पहिल्या टप्प्यात 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी रास्ता रोको करून रस्त्यावर दूध ओतून तसेच मोफत दूध वाटप करून महादूध एल्गार आंदोलन यशस्वी करून राज्य सरकारचे लक्ष वेधलेे होते.

मात्र राज्य सरकारने दुर्लक्ष करत दूध दरवाढ केली नाही म्हणून प्रदेश भाजपाच्यावतीने राज्यभरातून भाजपा महायुती महादूध एल्गार आंदोलन म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पोस्ट कार्ड पाठविले जाणार आहेत. या आंदोलनाचा प्रारंभ बुधवारी (दि. 19) श्रीवृद्धेश्वर कारखाना येथे आ. मोनिकाताई राजळे यांनी दूध उत्पादकांसह मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, शेषराव कचरे, दत्तात्रय मराठे, शरदराव पडोळे, पोपटराव चोथे आदी उपस्थित होते.

पाथर्डी येथे भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, सभापती गोकुळ दौंड, पंचायत समिती सदस्य विष्णूपंत अकोलकर, सुभाष केकाण, डॉ. सुहास उरणकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, नारायण पालवे, आदिनाथ धायतडक, बाळासाहेब शिरसाठ आदींनी मुख्य पोष्ट ऑफिसमध्ये पत्र टाकून पाठविले.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, दूध उत्पादक शेतकर्‍यांना वाचवा, गायीच्या दूधाला 30 रुपये प्रति लिटर भाव द्या, गायीच्या दूधाकरिता 10 रुपये प्रतिलिटर अनुदान द्या. तर दूध भुकटीला 50 रुपये प्रतीकिलो अनुदान द्या. आशा मागण्या करून मुख्यमंत्री महोदय जागे व्हा. शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करा, अशी साद घातली असून पत्र पाठविणाराचे नाव पत्ता व सही असा पत्रात मजकुर आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *