धाकट्या पवारांनी विखेंना पुन्हा टोलवले !
राजकीय

धाकट्या पवारांनी विखेंना पुन्हा टोलवले !

आरोग्यासोबत अर्थव्यवस्थाही महत्त्वाची : केंद्रातील मोदी सरकारचा निर्णय मान्य नाही का?

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य व अर्थकारण याचा मेळ घालून पुढे जावे लागेल, हे सरकारच्या लक्षात आले आहे. मात्र, काही लोकप्रतिनिधी लॉकडाऊनची मागणी करत असतील तर त्यांना केंद्रातील भाजप सरकारचा निर्णय मान्य नाही का? असा थेट टोला राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार यांनी भाजपाचे खा.डॉ.सुजय विखेंना लगावला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणी भाजपकडून राजकारण सुरू आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील तर सादर करावेत, असा सल्लाही त्यांनी भाजपा नेत्यांना दिला आहे. दरम्यान, आठवडाभराच्या अंतराने दुसर्‍यांदा पवारांनी राजकीयदृष्ट्या टोलवले आहे.

आ.पवारांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. केंद्रातील भाजप सरकारची पावले लॉकडाऊन उठवण्याकडे आहेत. पूर्वी दुचाकीवर एका व्यक्तीला परवानगी होती, आता ती केंद्राने दोन व्यक्तींना केली आहे. करोनाच्या काळात आरोग्य व अर्थकारण याचा मेळ घालावा लागेल. गरिबांची रोजी-रोटी बंद पडता कामा नये. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला काळजी घ्यायचीच आहे. परंतु दुसरीकडे उपाशी राहून कोणाचा जीव जायला नको.

त्यामुळे यावर सूवर्णमध्य काढून पुढे जावे लागेल. केंद्र सरकारच लॉकडाऊन उठवण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. मग केंद्राचे निर्णय आपल्याला मान्य नाहीत का? असा टोला त्यांनी डॉ. खा विखे यांना नाव न घेता लगावला. एवढेच नव्हे तर लॉकडाऊनची गरज नसल्याचे स्पष्टपणे सांगत त्यांनी प्रशासनाची बाजू घेतली आहे. यापूर्वी केंद्रातील नेत्यांना खूश करण्यासाठी विखे पवारांवर टीका करत असावेत, असा चिमटा पवारांनी काढला होता.

बिहार निवडणुकीवर डोळा

भाजपला सोशल मीडियावर कोणता ट्रेंड चालवला पाहिजे, हे चांगल्या पद्धतीने जमते. भाजपवाले शब्दच्छल चांगला करतात. सुशांतसिंग बिहारचा आहे व आता बिहारच्या निवडणुका आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोणी राजकारण करत असेल तर ते चुकीचे आहे. यात सुशांतसिंग प्रकरण बाजूला राहायचे आणि यांचे राजकारण व्हायचे, असे होऊ नये अशी अपेक्षा असल्याचा चिमटाही आ. पवार यांनी काढला.

पोळी भाजू नका, पुरावे द्या !

सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी भाजप राजकारण करत असून त्यांनी केवळ हवेतील आरोप करू नयेत. ठोस पुरावे असतील तर ते पोलिसांकडे द्यावे. गेल्या पाच वर्षांत ज्या पोलिसांचे संरक्षण घेतले आता त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊ नये, असेही पवार यांनी भाजपला सुनावले. सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलीस चांगले काम करत आहेत. त्यामुळे पोलिसांना वेळ देणे गरजेचे आहे. यात राजकारण करून कोणी पोळी भाजून घेऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com