लोकशाही, संविधान ‘घाण्या’ला जुंपून वऱ्हाड निघालय...; नार्वेकरांच्या घाना दौऱ्यावरुन राऊतांचा हल्लाबोल!

लोकशाही, संविधान ‘घाण्या’ला जुंपून वऱ्हाड निघालय...; नार्वेकरांच्या घाना दौऱ्यावरुन राऊतांचा हल्लाबोल!

मुंबई | Mumbai

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकांवरील सुनावणी प्रलंबित असताना विधानसभा अध्यक्ष राहु नार्वेकर घाना दौऱ्यावर निघाले आहेत. 66व्या राष्ट्रकूल परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत घानाला जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या दौऱ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रातील लोकशाही, संविधान घाण्याला जुंपून वऱ्हाड निघालंय ‘घाना’ला, अशी बोचरी टिका राऊत यांनी केली.

शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या घाना दौऱ्यावर भाष्य केले. लोकशाही अस्थिर असणाऱ्या घाना देशात राष्ट्रकूल परिषदेच्या मंचावर महाराष्ट्र विधानसभे अध्यक्ष लोकशाहीवर प्रवचन देण्यासाठी चालले आहेत. महाराष्ट्रात लोकशाही घाण्याला जुंपून, लोकशाहीची हत्या करून ते घानाला निघाले आहेत. हे लाजिरवाणे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

तुम्ही जगाला लोकशाहीचे धडे देण्यासाठी निघाले आहात, पण महाराष्ट्रात संविधान, घटना, लोकशाही, स्वातंत्र्यांचा वर्षभरापासून खून करताय. एका बेकायदेशीर सरकारला आपण समर्थन देताय. सर्वोच्च न्यायालयाला आपण मानत नाहीत, त्यांचे निकाल आपण ऐकत नाहीत, मान्य करत नाहीत. तारखांवर तारखा देऊन घटनाबाह्य सरकार चालवताय. सर्वोच्च न्यायालयाने 8 दिवसात सुनावणी घेण्यास सांगितले, मात्र त्यातून पळ काढण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची वर्णी घानाला जाणाऱ्या प्रतिनिधीमंडळात लावण्यात आली. मूळ प्रतिनिधीमंडळामध्ये विधानसभा अध्यक्षांचे नाव नव्हते. पण त्यांना इथे उशीर करायचाय, या कारणाने त्यांना घानाला घेऊन चालले आहेत, अशी माझी पक्की माहिती असल्याचे राऊत म्हणाले.

लोकशाही, संविधान ‘घाण्या’ला जुंपून वऱ्हाड निघालय...; नार्वेकरांच्या घाना दौऱ्यावरुन राऊतांचा हल्लाबोल!
माणुसकी ओशाळली! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मदतीसाठी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत दारोदार फिरली पण...

आधी इथला निर्णय द्या आणि मग घानाला जा. जो काही निर्णय असेल तो द्या. तुम्ही निर्णय देत नाहीत याचा अर्थ असा आहे की तुम्ही तो निर्णय देऊ शकत नाहीत. तुम्ही फक्त वेळ काढताय. तुम्हाला अपात्र करायचे नाही, तर नका करू. पण हिंमतीने निर्णय घ्या. पण तुम्हाला ते घटनाबाह्य कृत्य करायचे नाहीय आणि म्हणून वेळ काढताय. घानाला पळून चालले आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

मुलुंडमध्ये मराठी माणसाला ऑफिस नाकारण्यात आल्याच्या वृत्तावर प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष याला जबाबदार आहे. शिवसेना त्यासाठीच फोडण्यात आली. मराठी माणसाचा आवाज कमजोर व्हावा, मराठी माणसाच्या अस्मितेसंदर्भात लढण्याची ताकत कमजोर व्हावी, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का बसावा, मुंबईवर मराठी माणसाचा पगडा नष्ट व्हावा या एका कारणासाठी एकनाथ शिंदे यांना हाताशी पकडून मराठी आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेना फोडली त्याचेच हे परिणाम आहेत. महाराष्ट्रीय लोकांना मुलुंड, मलबार हिल असेल इतकेच काय परळ-लालबागला जे टॉवर झालेत तिथेही जागा द्यायची नाही असेही निर्णय झाले. आम्ही आंदोलनं केली, करत राहू. पण हे चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com