सरकार पडेल...हे भाजपचे दिवास्वप्नच !
राजकीय

सरकार पडेल...हे भाजपचे दिवास्वप्नच !

ना. थोरात : सुशांतसिंह प्रकरणाचे राजकारण नको

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाविकास आघाडीचे हे सरकार कधी जाईल, हे दिवास्वप्न भाजप पाहत आहे. ते कधीच पूर्ण होणार नाही. त्यांची भविष्यवाणी कधीच खरी ठरणार नाही. महाविकास आघाडी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणार, असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे राजकारण करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महसूलमंत्री थोरात शुक्रवारी नगरमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही. हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका राज्यातील भाजप नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही लवकरच राज्यातील सरकारचे विसर्जन होईल, असे वक्तव्य केले आहे.

याबाबत ना. थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, आठवले यांनी नेमके काय वक्तव्य केले आहे, ते मी ऐकले नाही. परंतु भाजपचे लोक दिवास्वप्न पाहत आहेत की राज्यातील हे सरकार जाईल, आपले सरकार येईल. पण त्यांची ही भविष्यवाणी कधीच खरी ठरणार नाही. आम्ही पाच वर्षे चांगले काम करणार आहोत, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

सुशांतसिंह प्रकरणी कोणी राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पद्म पुरस्कार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. त्यावर बोलताना थोरात म्हणाले, मंत्रिमंडळाचे कोणतेही सदस्य हे या समितीचे सदस्य असतात. त्यामुळे कोणीही अध्यक्ष होऊ शकतो.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com