Saturday, April 27, 2024
Homeराजकीयजलसंधारणमंत्री शंकरराव गडाख अधिकृतरित्या शिवसेनेत

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख अधिकृतरित्या शिवसेनेत

नेवासा |तालुका वार्ताहर|Newasa

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते काल मंगळवारी रोजी मातोश्रीवर शिवबंधन बांधले असून त्यांचा अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे. दरम्यान, या प्रवेशासोबत संपूर्ण जिल्ह्यातील सेनेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ना.गडाखांच्या खांद्यावर आली आहे.

- Advertisement -

शंकरराव गडाख नेवासा विधानसभा मतदार संघात अपक्ष म्हणून निवडून आले होते. माझ्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या असलेल्या विश्वासामुळे शेतकर्‍यांचे तसेच विविध प्रश्न मी अधिक जोमाने सोडवू शकेल असे यानिमित्ताने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले. यावेळी सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

नगर जिल्ह्यातील नेवासा मतदार संघात शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आल्यावर त्यांनी निकाल लागताच दुसर्‍याच दिवशी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली होती. सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची शंकरराव गडाख यांच्यासमवेत अनेक वर्षांपासून मैत्री असल्याने विधानसभेत गडाख अपक्ष निवडून येताच नार्वेकर यांनी गडाखांना सेनेत येण्यासाठी आग्रह धरला होता.

सेना सतेत असो वा नसो मी तुमच्याबरोबर राहील असा ठाम शब्द गडाखांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी खासदार यशवंतराव गडाख यांचेही अत्यंत सलोख्याचे संबंध होते. दुसर्‍या पिढीतील दोन्ही कुटुंबातील सदस्य आता शिव बंधनात बांधले गेले आहेत.

नगर जिल्ह्यातील गडाख कुटुंब हे राजकारणातील मातब्बर नेते आहेत. नगर शहरातील सेनेचे माजी मंत्री व उपनेते अनिल राठोड यांचे मागील आठवड्यात निधन झाले. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नामदार गडाख यांच्यामुळे जिल्ह्यात शिवसेना वाढीला मोठी मदत होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शेतकर्‍यांची कर्जमाफी, उद्योग व्यवसाय, बेरोजगार तरुण तसेच समाजातील विविध घटकासाठी चांगले निर्णय घेतले असून राज्यावरील करोनाच्या संकट काळात मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले आहे.

माझे वडिल व हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहाचे संबंध होते. गेल्या 10 वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर अनेकदा संबंध आला म्हणून मी आज शिवसेना पक्षात प्रवेश करत असून त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकत मंत्रिपदाची संधी दिली. त्या विश्वासाला पात्र राहून सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार आहे व शिवसेना वाढिसाठी झटणार आहे. शिवसेना हा पक्ष शेतकरी, कष्टकरी तसेच सर्वसामान्य जनता यांच्या बरोबर असून शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग यात पक्षाचे मोठे काम आहे.

– शंकरराव गडाख , जलसंधारण मंत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या