आंबेडकर यांची भाजपला गरज नाही - ना.आठवले

आंबेडकर यांची भाजपला गरज नाही - ना.आठवले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भाजपमध्ये प्रकाश आंबेडकर यांची काही आवश्यकता नाही, पण त्यांनी स्थापन केलेल्या बहुजन वंचित आघाडीचा एकही आमदार व खासदार निवडून आलेला नाही,

त्यांनी फक्त मते खाण्याशिवाय काही केलेले नाही, त्यामुळे समाजाला त्याचा काहीही फायदा झालेला नाही. समाजाला फायदा होण्यासाठी त्यांनी एनडीए मध्ये यावं असे मी म्हणालो होतो, पण तशी त्यांची भाजपला काहीही गरज नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. आंबेडकरांचा भाजपाला काही उपयोग नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी आवर्जून केला.

नगरमधील काही कार्यक्रमानिमित्त ते शासकीय विश्रामगृहावर आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अजय साळवे, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री आठवले म्हणाले की, रिपब्लिकन ऐक्य आता होणे शक्य नाही. कारण प्रकाश आंबेडकर यांना रिपब्लिकन नेतृत्व कोणाचे मान्य नाही, म्हणून त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला. त्यांना आमचे नेतृत्व मान्य नव्हते. वास्तविक पाहता मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार होतो, असे सांगून आठवले म्हणाले, मी त्यांना एनडीएमध्ये या म्हणालो, ही वस्तुस्थिती आहे.

कारण, त्यांच्या पक्षाने मते खाण्याचे काम केले, त्याचा उपयोग समाजाला झाला नाही. वास्तविक पाहता जेव्हा आम्ही सगळे एक होतो, त्यावेळेला चार खासदार तरी निवडून आलेले होते, पण आता त्यांचा एकही खासदार व आमदार नाही ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे त्यांनी सोबत यावं, असे मी म्हणालो, पण तशी भाजपला त्यांची गरज नाही, असेही आवर्जून आठवले यांनी सांगितले

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. त्या संदर्भात केंद्र सरकारद्वारे सकारात्मक तोडगा काढण्याची तयारी आहे. मात्र आता या आंदोलनामध्ये राजकीय वास येऊ लागलेला आहे. त्या आंदोलनकर्त्यांनी कायदा मागे घ्यावा, अशी भूमिका मांडलेली आहे, पण जर तसे झाले तर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्य संविधानाला व लोकशाहीला धक्का लावणारे होईल, अशा पद्धतीने प्रत्येक कायदे मागे घेण्याच्या मागण्या होतील,

पण त्यामुळे संसदेला व लोकशाहीला काही अर्थ राहणार नाही, त्यामुळे नवे कृषी कायदे मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. जर कायद्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर ती सरकार करण्यास तयार आहे, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. दरम्यान महाराष्ट्रामध्ये जर महा विकास आघाडीचे सरकार पडले तर भारतीय जनता पार्टी सरकार बनवेल, असे त्यांनी सांगितले

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या. कोट्यावधी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या विविध विकास कामांना दिला. शेतकरी सन्मान योजना सुद्धा त्यांनी राबवली. सर्वाधिक योजना या नरेंद्र मोदी यांच्या काळात झाल्या आहेत, असे ते म्हणाले.

वास्तविक पाहता शेतकरी आंदोलन करनारांच्या मागे काँग्रेस उभी होती, असे म्हणतात मग राहुल गांधी हे इटलीला का निघून गेले, त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले का, असा सवाल आता आम्ही विचारू शकतो, असे आठवले म्हणाले.

महाराष्ट्र मध्ये सध्या ईडी कारवाई सुरू आहे, यामध्ये केंद्र सरकारचा व भाजपाचा कोणताही हात नाही. ईडी स्वतंत्र संस्था आहे. आम्ही काही कोणाला कारवाई करा, असे सांगितले नाही. त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. तुम्ही संपत्ती कमवा त्याबद्दल कुणाचे दुमत नाही, पण ती करताना त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण वेळेवर देणं महत्त्वाचं आहे. नाहीतर ईडीची शिडी जेलमध्ये नेईल, हे लक्षात ठेवावे असा इशाराही आठवले यांनी दिला.

महाराष्ट्र मध्ये महा विकास आघाडी स्थापन झाली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देशातील विरोधकांच्या म्हणजे यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव पुढे येऊ लागलेला आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा मला आदर आहे, त्याबद्दल दुमत नाही. मात्र दुसरीकडे काँग्रेस पक्ष हा देशांमधील राष्ट्रीय पक्ष आहे. सध्या सोनिया गांधी त्याचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे यूपीए अध्यक्षपद हे साहजिकच त्यांच्याकडे राहणार आहे.

त्यामुळे शिवसेनेने या पदावर पवारांच्या नियुक्तीची केलेल्या मागणीमुळे राज्यातील महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होऊ शकते. काँग्रेसने याचा सारासार विचार केला पाहिजे व प्रसंगी राज्याच्या सत्तेतून सुद्धा बाहेर पडले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. जर काँग्रेसच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडली तर भारतीय जनता पार्टी राज्यांमध्ये सत्ता स्थापन करेल, त्यासाठी आम्हाला कुणीही पाठिंबा दिला तरी चालेल मग आम्ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करू, असे आठवले म्हणाले.

कायदा बनवणे हा ज्या त्या राज्याचा अधिकार

उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या लव्ह जिहाद कायद्याच्या बाबतीत यावेळी रामदास आठवले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'कोणता कायदा करायचा, हा ज्या त्या राज्याचा अधिकार आहे. लव्ह जिहाद हा कायदा केवळ लग्नासाठी धर्मपरिवर्तन होऊ नये, असाच सांगणार आहे.' दरम्यान, या कायद्याला तुमचा पाठिंबा आहे का ? असे विचारले असता, ' कायदा बनवणे तो ज्या त्या राज्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.'

आठवले म्हणून...

'जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा उद्धव ठाकरे यांचे सरकार पडेल थंड... लवकरच होणार आहे या सरकारमध्ये बिघाडी, जाणार आहे महाविकास आघाडी...' अशा आपल्या खास शैलीमध्ये रामदास आठवले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com