Saturday, April 27, 2024
Homeराजकीयउसतोड कामगार प्रश्नांसंदर्भात बैठक; वंचितचे आंदोलन

उसतोड कामगार प्रश्नांसंदर्भात बैठक; वंचितचे आंदोलन

पुणे(प्रतिनिधी)

राज्यातील उस कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत बैठक सुरु आहे. दरम्यान, या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला बोलवावे यासाठी आघाडीच्या वतीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गेटसमोर गाड्या अडवून आणि जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी व प्रदेश अध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांना पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह अटक केली करून अज्ञात स्थळी नेले.

- Advertisement -

बैठकीला सुरुवात झाल्यानंतर भाजपचे आमदार सुरश धस यांनाही प्रवेश नव्हता. त्यांनी धरणे आंदोलन केल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना फोन करून बैठकीला बोलावून घेतले. त्याच दरम्यान वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते प्रदेश अध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीला वंचित बहुजन विकास आघाडीलाही बोलवावे अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यांनी काही काल ठिय्याही मांडला आणि गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी नेले.

यावेळी बोलताना प्रा. शिवराज बांगर म्हणाले, आजच्या बैठकीचे आमंत्रण आम्हला नव्हते. परंतु, आम्हाला विचारात घेतले पाहिजे. कारण उसतोड कामगार हा वंचित समाजात येतो. उसतोड कामगारांचे नेतृत्व उसतोड कामगाराने किंवा त्याच्या मुलाने करावे. साखर संघाचे संचालक आमचे नेते होऊ शकत नाही. आमचे दु:ख आम्हाला माहिती आहे. ‘ज्याच जळतं, त्यालाच कळतं’ असे म्हणत वंचित आघाडीला बैठकीला बोलवा असा आग्रह त्यांनी धरला. बैठकीला बोलावले नाही तर आज संध्यकाळपासून उसतोड कामगारांचा संप अधिक तीव्र करू. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला मुख्यमंत्री आणि शरद पवार जबाबदार असतील असे बांगर म्हणाले.

या बैठकीला विनायक मेटे, भाजपा आमदार सुरेश धस यांनाही निमंत्रण नव्हते, मात्र त्यांना ऐनवेळी प्रवेश देण्यात आला पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बैठकीला जाण्यापासून रोखण्यात आले. या विरोधात जाब विचारल्यावर पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना अटक केली. महाविकास आघाडी सरकारच्या या हुकूमशाही कृत्याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या