राजकीय घडामोडींना वेग! दिल्लीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दुसरी भेट

राजकीय घडामोडींना वेग! दिल्लीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दुसरी भेट

दिल्ली | Delhi

देशात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाल्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते.

त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली आहे. मुंबईत पवारांशी तब्बल साडेतीन तास चर्चा केल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा पवारांच्या भेटीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ऑपरेशन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बऱ्याच महिन्यानंतर काल दिल्लीत दाखल झाले. पवार दिल्लीत तीनचार दिवस राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज ते राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठकही करणार आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह केरळातील काही नेतेही उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्याचवेळी प्रशांत किशोर पवारांच्या 6, जनपथ या निवासस्थानी भेटीला दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुसाठी रणनीती आखण्याबाबत चर्चा झाल्याची बोललं जात आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. मात्र, भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलंय.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी प्रशांत किशोर पवारांच्या घरी १२ जून रोजी शुक्रवारी पोचले होते. तिथे या दोघांमध्ये विस्तृत चर्चाही झाली. प्रशांत किशोर यांनी शरद पवारांच्या घरी जेवणही घेतले. या भेटीचे वृत्त समोर आले आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. या भेटीमुळे अनेक अंदाज वर्तवले जाऊ लागले, अफवांचेही पीक आले. या बैठकीसंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही या भेटीला वैयक्तिक स्वरुपाची भेट असल्याचे सांगत अफवांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

प्रशांत किशोर यांनीदेखील या भेटीला सद्भावना भेट असेच म्हटले. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तृणमूल कॉंग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शविणाऱ्यांना धन्यवाद देण्यासाठीच्या 'धन्यवाद यात्रे'चा हा एक भाग असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com