'आजचा निकाल दुर्दैवी'; मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

'आजचा निकाल दुर्दैवी'; मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

'आता 'हाच' एकमेव पर्याय'

मुंबई l Mumbai

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकारने दिलेलं मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजातून तीव्र नाराजीचा सूर आळवला गेला. मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नाराजी जाहीर केली आहे. त्यांनी मराठा आरक्षणाच्या सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना हा निकाल समाजाच्या दृष्टीने दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली.

संभाजीराजे बोलतांना म्हणाले, 'बहुजन समाजाला आरक्षण मिळावं अशी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका होती. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. गरीब मराठ्यांसाठीच माझा हा लढा होता. बहुजन समाजात समावेश करुन घेतलं तर जातीय मतभेद ते कमी होतील, विषमता कमी होईल असा माझा प्रयत्न होता. पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असून तो मान्य करावा लागतो. पण समाजाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे,' अशी खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आजी आणि माजी अशा दोन्ही सरकारनेही समाजाची बाजू जोमाने मांडली. शक्य त्या सर्व परिने बाजू मांडूनही अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला, यासंदर्भात त्यांनी नाराजीचा सूर आळवला. शांतताप्रिय मोर्चे आरक्षणासाठी निघाले, आरक्षणाची किती गरज असल्याचे हे समाजाने जगाला दाखवून दिले. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही बाब नाकारत निर्णय दिला, त्यापुढे आम्ही निशब्द असल्याचे म्हणत सध्या सुरु असणारे कोविडचे संकट पाहता ही वेळ उद्रेकाने पेटून उठण्याची नसल्याचे इशारा त्यांनी दिला.

'आरक्षणाच्या बाबतीत या मुद्द्याकडे मी राजकारणाच्या पलिकडे पाहिले, अखेरच्या टप्प्यातही केंद्र, राज्य आणि राज्यातील यापूर्वीच्या सरकारने समाजाची बाजू मांडली, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापुढे कोणालाही जाता येणार नाही. असे असले तरीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज म्हणून समाजासाठी आपल्याला वाईट वाटत' असल्याचे त्यांनी म्हंटल आहे.

तसेच 'राज्याला आणि नागरिकांना करोना परिस्थितीतून सावरुन तज्ज्ञांनी बसून चर्चा करणे आवश्यक आहे. मराठा समाजासाठी 'सुपर न्यूमररी' न्यायाने जागा द्या हाच एकमेव पर्याय असल्याचा मार्ग त्यांनी सुचवला. इतर राज्यांना ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यात आले, मग आपल्या राज्याला का नाही? हा सवालही त्यांनी उपस्थित करत या महाभयानक परिस्थितीमध्ये सध्या करोना रुग्णांवर लक्ष द्या. न्यायालयाच्या निकालाचा मान ठेवा याचा पुनरुच्चार केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com