“ताकदच पाहायची असेल तर...”; राणेंच्या टीकेनंतर संभाजीराजेंचं सूचक ट्वीट

“ताकदच पाहायची असेल तर...”; राणेंच्या टीकेनंतर संभाजीराजेंचं सूचक ट्वीट

मुंबई | Mumbai

मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये मोठी नाराजी पसरली आहे. मात्र खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेत्यांनी स्वत:च्या पक्षाचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले यांनाही या मुद्द्यावरून लक्ष्य केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यानंतर खासदार नारायण राणे यांनीही संभाजीराजेंवर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर संभाजीराजेंनी सूचक ट्विट केलं आहे.

छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. संभाजीराजे ट्विट करत म्हणाले, 'छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.'

“ताकदच पाहायची असेल तर...”; राणेंच्या टीकेनंतर संभाजीराजेंचं सूचक ट्वीट
संभाजीराजेंमध्ये ती धग नाही - नारायण राणे

संभाजी छत्रपती यांनी काल ट्विट करून शिवराज्यभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं विधान केलं होतं. ‘मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड ! लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज ! दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे. स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत’, असं संभाजीराजे म्हणाले.

काय म्हंटले होते नारायण राणे?

गुरुवारी नारायण राणे यांनी संभाजीराजे यांच्यावर खोचक अशी टीका केली. संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्यानं ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का?, असा प्रश्न राणे यांनी काल उपस्थित केला होता. राणेंच्या या टीकेनंतर संभाजीराजे यांनी इशारा देणारं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये संभाजीराजेंनी कोणाचंही नाव न घेता इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.