संभाजीराजेंमध्ये ती धग नाही – नारायण राणे

पुणे (Pune)

जिल्हे फिरून आणि भेटी घेऊन आरक्षण मिळत नाही.त्यातून पुढारपण देखील मिळत नाही. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देऊ नये. संभाजी राजे रायगडावरून आपली भूमिका मांडणार आहेत. रायगडावर आहे कोण? लोकांमधे जाऊन आंदोलन करावे लागते. संभाजीराजेंमध्ये ती धग नाही अशी टीका भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर केली. आता त्यांची खासदारकी संपत आली आहे. म्हणून ते राजीनामा देण्याची भाषा बोलत आहेत, असा चिमटाही राणे यांनी काढला. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील जिल्ह्यांचा दौरा करून विविध राजकीय पक्षाचे नेत्यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारला काही निर्णय घेण्यासंदर्भात 6 जूनचा अल्टीमेटम दिला आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास 6 जूनला रायगडावर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत राणे यांना विचारले असतं राणे म्हणाले, रायगडावर कोण आहे? आंदोलन हे नेहेमी लोकांमध्ये करायचे असते. ते राजे आहेत, जनता त्यांच्याकडे गेली पाहिजे. मात्र, हेच जिल्हयाजिल्ह्यात फिरत आहेत. जिल्हे फिरून कोणी नेता होत नाही आणि आरक्षणही मिळत नाही. संभाजीराज्यांमध्ये ती धग दिसत नाही. खासदारकी संपता संपता हे सगळे कसे आठवायला लागले असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही.

राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. मी शिवसेनेत 39 वर्षे होतो त्यामुळे मला उद्धव ठाकरे यांची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका माहिती आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, अशी टीका राणे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांचा अभ्यास कुठे आहे हो ? ते साधा एक प्रस्ताव वाचू शकत नाहीत. तेवढा वेळ मिळाला नाही. ते उद्गार काढतात का? मी इतके वर्ष त्यांचा बरोबर होतो ते कधी उद्गार काढताना दिसले नाहीत.

राणे म्हणाले, अरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका मला माहित आहे. ते आरक्षणाच्या बाजूने नाहीत. त्यामुळे त्यांनी चांगली यंत्रणा दिली नाही. फडणवीसांनी ज्या मुद्यांवर आरक्षण दिले होते. ते मुद्दे मांडण्यात वकील कमी पडले. भाजपचे पाच वकील नेमलेले आहेत ते सरकारला मदत करतील असा प्रस्ताव सरकारला देणार आहोत. राज्यात आरक्षण आहे मग आमचेच रद्द का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे असलेले आरक्षण गेले आहे. न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा उपाय राज्य सरकारच्या हातात असून, त्वरित याचिका दाखल करावी, अशी मागणी त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारने बेफिकीरी दाखवल्याने सर्वोच्च न्यायालयात चांगल्या रितीने बाजू मांडली गेली नाही. सरकारच्या वकिलांमध्ये समन्वय नव्हता, वकील वेळेत न्यायालयात हजर झाले नाहीत. सरकारने खटला चालविण्यात टाळाटाळ करून तारखा मागितल्या, गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या परिशिष्टाचे इंग्रजीत भाषांतर करून दिले नाही व त्यामुळे आयोग एकतर्फी असल्याचा समज निर्माण झाला, अशा अनेक चुका या सरकारने केल्या. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीने तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. १०२ व्या घटनादुरुस्तीनंतरही मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी सर्वप्रथम राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज मागास असल्याचा अहवाल नव्याने घ्यावा लागेल. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण व रोजगारासाठीच्या सवलती द्याव्यात व त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज मराठा समाजाला द्यावे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करेपर्यंत मराठा समाजातील ज्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती त्यांना सरकारी नोकरीत तातडीने नियुक्ती द्यावी, अशी मागणीही राणे यांनी केली आहे.

शरद पवारांनी आता तरी बोलावे

शरद पवार हे राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यावेळी आर्थिक निकषावर का आरक्षण दिले नाही. त्यांच्या पुढाकाराने हे सरकार सत्तेत आले आहे मग सरकारला तशा सूचना त्यांनी द्याव्यात. आता तरी समाजाच्या मागे शरद पवार यांनी उभे रहावे आणि मराठा आरक्षणाबाबत बोलावे अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली.

करोना संपावा म्हणून उद्धव ठाकरे काय करत आहेत?

देशातील एकूण मृत्यूच्या 1/३ माणसे महाराष्ट्रात कोरोनाने गेली. 96 हजार लोक मेली. करतात काय उद्धव ठाकरे? राज्यातील कोरोना संपवावा यासाठी काय काम केलं. उठ सुठ केंद्राकडे बोट दाखवत आहेत. मातोश्रीच्या बाहेर येत नाहीत. कोरोना संपवा म्हणून ठोस कारवाई केली नाही. ग्लोबर टेंडर काढले आणि त्याला 12 टक्के मागितले. त्यानंतर ते टेंडर रद्द झाले, असेही त्यांनी सांगितले.

तर पटोलेंना वाजऊ

नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. त्यांना पप्पू संबोधले. पंतप्रधान हे एका पक्षाचे नाही तर ते भारताचे आहे. त्यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असला पाहिजे. राहुल गांधीला लोक पप्पू म्हणतात. मोदी यांच्या स्वभावात रडणे नाई तर लढणे आहे.ते धाडसी नेतृत्व आहे. मात्र,पटोले त्यांचं अज्ञान प्रकट करत आहेत. त्यांनी स्वतची क्षमता, पात्रता ओळखून बोलावे. लायकी नसलेला माणूस काँग्रेसचा अध्यक्ष झालाय. पक्ष काढण्याऐवजी कळ काढणारा आहे. परत त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली तर नाना.. आम्ही वाजवून टाकू..भजन, अशा शब्दांत त्यांनी नाना पटोले यांना इशारा दिला.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *