
मुंबई | Mumbai
एकीकडे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj JarangePatil)यांचे शांततेत उपोषण आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे आरक्षण समर्थकांनी हिंसक पवित्रा घेतला आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला गालबोट देखील लागले असून जाळपोळीच्या घटना घडत (Direction Of Maratha Movement has Gone Astray)आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक बोलावण्यात आली होती. या समितीने आत्तापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल समिती सादर केला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील तपशील सर्वांसमोर मांडला. तसंच मराठा बांधवांना शांततेचे आवाहन केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे, टोकाचं पाऊल उचलू नये. आज मराठा समाजातील नेते आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु,त्यांनाच गावबंदी केली जात आहे. हे राज्याच्या हिताचं नाही. समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे, याची दखल मराठा समाजाने आणि मराठा नेत्यांनी घेतली पाहिजे आणि सरकारला वेळ दिला पाहिजे. आंदोलनाची दिशा भरकटली आहे. कोणत्याही समाजाची फसवणूक आम्ही करणार नाही. हा वेळकाढूपणा आम्ही करणार नाही. जे देणार ते टिकाऊ आणि नियमांत बसणारे देणार आहोत”, असे आश्वासन शिंदेंनी दिले.
पुढे मुख्यमंत्री असे ही म्हणाले, “मी सर्वांना शांततेचं आवाहन करतो. मनोज जरांगे पाटलांनी उपचार घ्यावेत. सरकारला अवधी दिला पाहिजे. जो अवधी वाढवून दिला आहे, त्यातून मोठ्या प्रमाणावर जुन्या नोंदी निष्पन्न होत आहेत.” “मराठा समाजाचे ५८ मोर्चे या राज्यात निघाले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे मोर्चे निघाले.
या मोर्चाला कुठेही गालबोट लागले नाही. त्यामुळे लाखा लाखांचे मोर्चे काढून देखील कोठेही राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली नाही. परंतु दुर्दैवाने काही लोक कायदा सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत. जाळपोळ सुरू आहे. मला वाटते मराठा समाजाने सजग होऊन याकडे पाहिले पाहिजे. आंदोलनाला गालबोट लागल्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण झाली आहे”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
“मराठा समाज बांधवांना विनंती आहे की टोकाचे पाऊल उचलू नका. आत्महत्येसारखे पाऊल उचलू नका. मुलाबाळांचां आईवडिलांचा विचार करा. त्यांना वाऱ्यावर सोडू नका. त्यांना भावनिक आवाहन करतो. आम्ही देणारे आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही कोणालाही फसवू शकणार नाही, फसवणार नाही, फसवू इच्छित नाही, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.