Sunday, April 28, 2024
Homeराजकीयशरद पवारांच्या भेटीनंतर संभाजीराजे घेणार राज ठाकरेंची भेट

शरद पवारांच्या भेटीनंतर संभाजीराजे घेणार राज ठाकरेंची भेट

मुंबई | Mumbai

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर मराठा समाजात पुन्हा संताप, अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ते ठिकठिकाणी आपली भूमिका मांडताना दिसतायत.

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनसंभाजीराजे भोसले आज दुपारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. दरम्यान संभाजीराजे यांनी गुरुवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी आज (२७ मे) सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही भेट सकारात्मक झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. तसेच, ‘मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे. तसंच मराठा समाजाच्या परिस्थितीची कल्पना शरद पवारांना दिली. तुम्ही पुढाकार घ्यावा अशी मी विनंती केली असून मुख्यमंत्री, विरोधी पक्ष, नारायण राणे यांना एकत्र आणलं पाहिजे असा आग्रह केला,’ अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.

संभाजी राजे उद्या मुंबई मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत. राज्यात मराठा आरक्षण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात झाला आहे. पण आता कोर्टाने ते रद्द केले आहे. दरम्यान कोविड परिस्थिती पाहता संभाजीराजेंनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचं आवाहन केले आहे. मोर्चे, उद्रेक टाळून आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी मराठा समाजाला वारंवार केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या