मराठा समाज झुकणार नाही - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

मराठा आंदोलकांवरील सरकारच्या दडपशाहीचा निषेध
मराठा समाज झुकणार नाही - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मराठा आरक्षणासाठी ( Maratha Reservation ) सोलापूरमध्ये ( solapur )आयोजित केलेल्या मोर्चाच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने प्रचंड पोलीस बळ वापरून दडपशाही केली, त्याचा भाजप तीव्र निषेध करते. अशा प्रकारे आक्रोश दाबण्याचा सरकारचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही आणि मराठा समाज कधी झुकणार नाही, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state president Chandrakant Patil )यांनी रविवारी दिला.

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण न्यायालयाकडून रद्द झाले. त्याबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी रविवारच्या सोलापूरमधील मोर्चासाठी जय्यत तयारी केली होती. त्यासाठी जिल्ह्यातील गावोगावातून हजारो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मराठा स्त्री पुरुष सोलापूरकडे रवाना झाले होते. पण सरकारने पोलिसी बळाचा वापर करून ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांना अडवले आणि सोलापूरमधील मोर्चा होऊ नये यासाठी दडपशाही केली, असा आरोप फडणवीस यांनी केला.

मराठा समाजातील समन्वयकांना पोलिसांनी कालपासूनच नोटिसा बजावल्या होत्या. पण अशी दडपशाही करून सरकार मराठा समाजाचा आक्रोश दाबू पाहत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. दबाव आणला तर मराठा समाज सरकारविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.

भाजप सरकारच्या काळात लाखो मराठा समाजबांधवांच्या सहभागाने मोर्चे निघाले. आम्ही त्या सर्व मोर्चांचा सन्मान केला. फडणवीस सरकारने मराठा मोर्चाच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य करून अंमलबजावणी केली. पण महाविकास आघाडी सरकारचा मराठा समाजाबद्दल एवढा राग आहे की, मराठा समाजाने आपल्या मागण्या मांडणेसुद्धा त्यांना सहन होत नाही, अशी टीका पाटील यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com